नेवासा येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानचे संस्कार, संस्कृती व स्वसंरक्षण शिबिर

नेवासा : नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संस्कार, संस्कृती व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नुकतेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे ह.भ.प. महंत देवीदास महाराज म्हस्के आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमाच्या वंदना दीदी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्रिमूर्तीचे संस्थापक साहेबराव घाडगे, अध्यक्षा अॅड. सुमतीताई घाडगे उपस्थित होत्या.
ह.भ.प. देवीदास महाराज यांनी नारी शक्तीचा गौरव करत पुरातन काळापासून शस्त्र व शास्त्रातील महिलांच्या योगदानाचा उल्लेख केला. वंदना दीदी यांनी ध्यान साधनेचे महत्त्व पटवून धैर्य आणि संयमाचे मूल्य मुलींना सांगितले.
प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अमृताताई नळकांडे यांनी सांगितले की, पुढील दहा दिवस कराटे, लाठीकाठी, तलवारबाजी, भालाफेक, रायफलबाजी, योगासन, ध्यानधारणा, अंतराळ विज्ञान, जंगल सफारी, बौद्धिक सत्र, रांगोळी, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
१३ ते २५ वयोगटातील मुलींनी या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला असून, सुट्टीचा सदुपयोग करून संस्कार व स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत, असे आवाहन आयोजकांनी केले. शिबिरात चारुता कडुरकर, जयप्रकाश खोत, श्रीकांत नळकांडे, प्रशांत बहिरट, गणेश जामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.





