आता ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’, चिन्ह सुद्धा ठरलं; संभाजीराजेंच्या संघटनेला निवडणूक आयोगाची मान्यता

Sambhajiraje Chhatrapati | माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मागील काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटना स्थापन केली होती. आता अखेर संभाजीराजे यांच्या संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” असे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पक्षाचे नाव आहे.
तसेच निवडणूक लढवण्यासाठी सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळाले असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. याबाबत संभाजीराजे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
संभाजी राजे यांनी लिहिले की, “आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल. याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे.”
आनंदवार्ता…!
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की,दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे… pic.twitter.com/9hzkmXYegJ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) October 1, 2024
पुढे ते म्हणाले, “मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित….” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. यातच आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा देखील समावेश झाला आहे.





