हास्याचा डब्बल डोस घेऊन स्वप्नील-सोनालीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला! सुशीला सुजित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
Updated On:

Sushila Sujeeth Movie Trailer : मराठी सिनेसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरलेला चित्रपट म्हणजे स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सुशीला सुजीत’. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटातून स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी या जोडीला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सुशीला सुजित चित्रपट १८ एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
ट्रेलर कसा आहे?
ट्रेलरची सुरुवात एका आईने पोलिस स्टेशनमध्ये आपला मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवतानापासून होते. पोलिस तिला विचारतात, “घरात भांडण वगैरे झालं होतं का?” यानंतर पार्श्वभूमीवरून आवाज येतो की, मुलगा तब्बल 35 तासांपासून बेपत्ता आहे. पुढे ट्रेलरमध्ये स्वप्नील आणि सोनाली एका घरात बंद दाराआड अडकलेले दिसतात. त्यांचे मोबाईलही बाहेर राहिल्याने परिस्थिती आणखी मजेदार बनते. दोघेही सुटकेसाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करतात. पण त्यांनी केलेला प्रत्येक प्रयत्न फोल ठरतो. हे दोघे यातून कसे बाहेर पडतात हे पाहणे चित्रपट पाहवा लागेल. या चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रेक्षक भरभरून कौतुक केरण्यात येत आहे.
ट्रेलरमध्ये अथर्व सुदामे आणि नम्रता संभेराव यांचीही झलक पाहायला मिळते. हे दोघे बंद दाराआड अडकल्यास किंवा चावी आत राहिल्यास काय करावे, याबाबत टिप्स देताना दिसतात. तसेच, प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर यांच्याही विशेष भूमिका या चित्रपटात आहेत. ‘पंचशील एन्टरटेन्मेंट’ आणि ‘बिग ब्रेन प्रॉडक्शन्स’ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, कथा आणि दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. पटकथा आणि संवाद अजय कांबळे यांनी लिहिले आहेत. निर्मात्यांमध्ये प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, संजय मेमाणे, मंजिरी ओक आणि निलेश राठी यांचा समावेश आहे. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.





