अखेर स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अटक; १७ विद्यार्थींनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली कारवाई

Swami Chaitanyananda Saraswati | वसंत कुंज परिसरातील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या महाराजाला 17 विद्यार्थींनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. अखेर रविवारी पहाटे ३:३० वाजता आग्रा येथील एका हॉटेलमधून स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी अटक केली आहे.
स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला आग्रा येथून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला होता. तसेच त्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी त्याने न्यायालयात अर्ज देखील दाखल केला होता.
मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांनी सांगितले की, तपास प्राथमिक टप्प्यात आहे आणि फसवणूक, कट रचणे आणि निधीचा गैरवापर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांना कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ही घटना दक्षिण दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट येथे घडली. तेथील विद्यार्थींनींनी बाबा चैतन्यनंदविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली आहे. दिल्लीतील वसंत कुंज पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच या बाबाने विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे.
तो प्राध्यापकांशी हस्तक्षेप करून त्यांच्यावर दबाव आणत असे, अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यानंतरही प्रतिसाद न दिल्यास चैतन्यानंद सरस्वती हा मुलींना वर्गातील अनुपस्थिती कमी दाखवण्याची अथवा परीक्षेत कमी गुण देण्याची धमकी देत असे.
या आरोपानंतर प्रसिद्ध आश्रमाच्या प्रशासनाने स्वामी चैतन्यनंद सरस्वतीला संचालक पदावरून काढून टाकलं आहे. तसेच स्वामी चैतन्यनंद सरस्वती हा देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लूक-आउट नोटीस देखील जारी केली होती. अखेर त्याला आग्राच्या ताजगंज येथील हॉटेल फर्स्ट येथून अटक करण्यात आली.
पोलिसांनी सांगितलं “एकूण ३२ विद्यार्थिनींनी पार्थसारथीविरोधात तक्रार दाखल केली असून त्यापैकी १७ मुलींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या मुलींनी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे. चैत्यनानंद त्यांना अश्लील मेसेजेस पाठवत होता, त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलत होता, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, असं या मुलींनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार स्वामी चैतन्यनंद सरस्वतीविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे.” Swami Chaitanyananda Saraswati |
स्वामी चैतन्यानंद सरस्वती कोण आहे?
62 वर्षीय स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा स्वयंभू संत किंवा बाबा म्हणून ओळखले जातो. तो दिल्लीतील वसंत कुंज येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रमुख आहे. सुमारे १२ वर्षांपासून या आश्रमात राहतो आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) छात्रवृत्ती कार्यक्रम चालवतात. त्याचे खरे नाव पार्थ सारथी आहे. Swami Chaitanyananda Saraswati |





