Swadhar Yojana : ‘या’ विद्यार्थांसाठी सर्वात मोठी बातमी! 15 सप्टेंबरपर्यंत…., समाज कल्याण विभागाचे महत्वाचे आवाहन
Swadhar Yojana : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या 2026-27 नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज सुरू. पात्र विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पूर्वी अर्ज करावा.

Student Scheme : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार’ योजना राबविण्यात येत आहे.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी योजनेच्या नूतनीकरणाचे ऑनलाइन अर्ज 15 सप्टेंबर 2026 पर्यंत करता येणार आहेत.
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने बाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते.
ऑनलाइन अर्ज कुठे करायचा?
‘स्वाधार’ योजनेच्या नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांना https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 आहे.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता नूतनीकरणाचा ऑनलाइन अर्ज विहित वेळेत सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.





