Alandi : आळंदीतील सिद्धबेटात स्वच्छता अभियान; विद्यार्थ्यांसह 450 जणांचा सहभाग
Alandi : आळंदीतील सिद्धबेट येथे ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अभियानात ३७० विद्यार्थी व प्रतिनिधी आणि ८० नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत श्रमदान केले.

Alandi : स्वच्छ भारत अभियान २.०, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), स्वच्छ सर्वेक्षण २०२६ आणि माझी वसुंधरा अभियान ७.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ महास्वच्छता अभियानाचा आळंदी शहरात गुरूवारी (दि. १७) शुभारंभ करण्यात आला. या अभियानात विविध शाळा, सामाजिक संस्था आणि आळंदी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सिद्धबेट येथे आयोजित स्वच्छता मोहिमेत शहरातील सात शैक्षणिक व सामाजिक संस्थांमधील एकूण ३७० विद्यार्थी व प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्याचबरोबर आळंदी नगरपरिषदेचे ८० कर्मचारीही या उपक्रमात सहभागी झाले. त्यामुळे मोहिमेत एकूण ४५० जणांनी श्रमदान करून स्वच्छतेचा संकल्प केला.
अभियानात ज्ञानसाई शाळेचे ४५, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे १५, नगरपरिषद शाळा क्रमांक १ चे ११०, दुराफे विद्यालयाचे ३०, ध्यास फाउंडेशनचे २०, ज्ञानेश्वर विद्यालयाचे ८० आणि ज्ञानगंगा संस्थेचे ७० विद्यार्थी व प्रतिनिधी सहभागी झाले.
विद्यार्थी आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी सिद्धबेट परिसरातील स्वच्छता करत परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश दिला. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याच्या सवयीला प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या मोहिमेत सहभागी झालेल्या ४५० जणांनी श्रमदानातून स्वच्छतेचा संदेश देत शहरातील नागरिकांनीही सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
“स्वच्छता ही सेवा अभियानातून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग कौतुकास्पद असून, नागरिकांनीही स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा.” – माधव खांडेकर (मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद)





