सुवेंदू यांनी आता दिला नवा मुहूर्त

कोलकता -पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे सरकार तीन महिन्यांनंतर टिकणार नाही, असा दावा भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार सत्तेवरून जाणार असल्याचे सांगताना त्यांनी नवा मुहूर्त दिला.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार आता सहा महिनेच सत्तेवर राहील, असे भाकीत नुकतेच ममतांनी केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू यांनी राज्य सरकार कोसळण्याचा नवा मुहूर्त सांगितल्याचे मानले जात आहे. दरम्यान, तृणमूलने सुवेंदू यांच्यावर पलटवार केला. राजकीय नैराश्यातून ते अशाप्रकारची वक्तव्ये करतात.
त्यांनी याआधी डिसेंबर 2022 पर्यंत सरकार कोसळणार असल्याचे म्हटले होते. त्या दाव्याविषयी त्यांना प्रथम विचारायला हवे. आता त्यांनी नवी वेळ सांगितली आहे. त्यांची वक्तव्ये गांभीर्याने न घेण्याचा सल्ला आम्ही जनतेला देतो, असे तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटले. बंगालमधील लोकसभेच्या 42 पैकी 36 जागा भाजप जिंकेल, या सुवेंदू यांच्या दाव्याचीही त्यांनी खिल्ली उडवली. पुढील लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजप पराभूत होणार असल्याचा प्रतिदावा त्यांनी केला.





