मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलमान खान ज्या सेटवर शुटींग करत होता तिथे एका व्यक्तीने बेकायदेशीररित्या प्रवेश केला. यानंतर सलमान खानच्या सुरक्षारक्षकांनी हटकले असता त्याने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकावलं. यामुळे सेटवर मोठी खळबळ उडाली. यानंतर या व्यक्तीला शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले आहे. काय घडले नेमके? ही घटना मुंबईमधील झोन-5 मध्ये घडली. संशयित आरोपीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर केला. पोलीस आता या व्यक्तीची चौकशी करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार घडला तेव्हा सलमान खान सेटवरच होता. सलमान सेटवर असताना ही अज्ञात व्यक्ती आतमध्ये आली. त्यावेळी सेटवरील सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला पाहून हटकलं असता त्याने लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलीस काय म्हणाले? दादर पश्चिममध्ये शुटींग सुरु होतं. सलमानच्या एका चाहत्याला शुटींग पाहायचं होतं. मात्र सुरक्षारक्षक त्याला धक्काबुक्की करत होते. या व्यक्तीला आतमध्ये जायचं होतं त्यावरुन वादावादी झाली. त्यावेळी संतापलेल्या या तरुणाने लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या व्यक्तीला पकडून ठेवत पोलिसांना बोलावलं. हा तरुण मुंबईचा रहिवासी आहे. यानंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली असता त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आलेली नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या मागच्या काही काळापासून सलमान खान बिष्णोई गँगच्या रडारवर आहे. बिष्णोई गँगमधल्या काही जणांनी सलमान खानच्या वांद्र्याच्या घराबाहेर गोळीबारही केला होता. यानंतर सलमान खानचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रावदी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर बिष्णोई गँगने गोळीबार केला, या हल्ल्यात बाबा सिद्दिकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.