Police Death : उधमपूरमध्ये दोन पोलिसांचा संशयास्पद मृत्यु; पोलिस व्हॅनमध्ये सापडले मृतदेह

Udhampur – जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात रहमबल भागात दोन पोलिसांचे मृतदेह संशयास्पदरित्या सापडले आहेत. दोघांनाही लागलेल्या गोळ्या या एके-४७ रायफलमधून झाडलेल्या आहेत. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
रविवारी सकाळी 6.30 च्या सुमारास उधमपूर जिल्हा मुख्यालयातील काली माता मंदिराबाहेर पोलिस व्हॅनमध्ये पोलिसांचे गोळ्या झाडलेले मृतदेह पडलेले आढळले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. एकमेकांवर गोळीबार केल्याने दोन्ही पोलिसांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेमागे एकमेकांतील कलह असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे पोलीस कर्मचारी विभागाच्या वाहनातून सोपोरमधील एसटीसी तलवाडा येथे जात असताना गोळीबार झाला. घटनेमागील सत्य शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात या घटनेत एके-47 रायफलचा वापर झाल्याचे सिद्ध झाले आहे. तिसरा पोलिस कर्मचारी सुरक्षित असून त्यांना पोस्टमॉर्टम आणि इतर प्रक्रियेसाठी उधमपूर येथे नेण्यात येईल.





