Pune : कोथरूडमध्ये ज्येष्ठ महिलेचा संशयास्पद मृत्यू; बंद खोलीत आढळून आला जळालेल्या अवस्थेत मृतदेह

Pune | कोथरूड परिसरातील एका सोसायटीत ७६ वर्षीय ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत मृत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा संशय कोथरूड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कमल संपतराव घुगे (वय ७६, रा. गुरूगणेशनगर, कोथरूड) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या भाडेतत्वावरील सदनिकेत एकट्याच राहत होत्या. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सोसायटीतील रहिवाशांनी सदनिकेतून धूर येत असल्याचे पाहिले. त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली.
याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पहिल्या मजल्यावरील सदनिकेचा दरवाजा उघडला असता घुगे गंभीररीत्या होरपळलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या महिलेला पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी घोषिति केले.
सदनिकेतील इतर साहित्याला आग लागलेली नव्हती. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. घुगे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या सदनिकेत एकट्याच राहत होत्या. त्यांचे नातेवाईक दुसऱ्या ठिकाणी राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, घुगे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात येत आहे. प्रकरणाचा पुढील तपास कोथरुड पोलिस करत आहेत.





