दुखापतग्रस्त सिराज खेळण्याबाबत सस्पेन्स ; इशांत शर्मा किंवा उमेश यादवला संधी मिळण्याची शक्यता

केप टाऊन – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना 11 जानेवारीपासून केप टाऊनमध्ये होणार आहे. तत्पूर्वी, मालिकेतील शेवटच्या कसोटीत वेगवान गोलंदाज महंमद सिराजच्या खेळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. या सामन्यात दोन्ही संघांची प्रतीष्ठा पणाला लागणार आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान महंमद सिराजला दुखापत झाली होती. याबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, सिराज त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. मात्र 11 जानेवारीपासून केप टाऊनमध्ये खेळवल्या जाणाऱ्या अंतिम कसोटीसाठी तो उपलब्ध असेल, असे आम्ही खात्रीने सांगू शकत नाही. सिराज अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.
आम्ही त्याच्या फिटनेसवर सतत लक्ष ठेवून आहोत. तो किती फिट झाला आहे हे येत्या 4 दिवसांत कळेल. सिराज पूर्णपणे फिट असेल तरच तो केपटाऊन कसोटीत मैदानात उतरु शकतो, असे त्यांनी सांगितले.तसेच सिराजच्या जागी इशांत शर्मा आणि उमेश यादव हे दोन पर्याय भारतीय संघाकडे आहेत. याशिवाय या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचे कमबॅक निश्चित मानले जात आहे. विराट पाठदुखीमुळे दुसरा कसोटी सामना खेळू शकला नव्हता.





