गुजरातमध्ये ‘चांदीपुरा’ व्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या वाढली

Chandipura Virus | गुजरातमध्ये चांदीपुरा या विषाणूचा धोका अधिक वाढत आहे. मागील एक महिन्यापासून गुजरातच्या अनेक भागांतून या संसर्गाची अनेक प्रकरणे समोर आली. गुजरातशिवाय हा विषाणू मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. अहवालानुसार, गुजरातमध्ये या व्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या 50 हून अधिक झाली आहे, तर 20 संशयित मुलांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाने पालिकेसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना एक परिपत्रक जारी करून 15 वर्षांखालील मुलांमध्ये आजाराची लक्षणे दिसल्यास त्यांना तातडीने दाखल करून त्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसच्या संशयित रुग्णांची संख्या 58 वर पोहोचली आहे.
चांदीपुरा व्हायरसची लक्षणे कोणती?
चांदीपुरा विषाणूमुळे रुग्णाला ताप येतो. यात फ्लूसारखी लक्षणे आणि गंभीर एन्सेफलायटीस आहे. एन्सेफलायटीस हा एक आजार आहे ज्यामुळे मेंदूला सूज येते. 15 वर्षांखालील मुलांना अचानक ताप येणे, उलट्या, पोटदुखी, चक्कर येणे अशी लक्षणे आढळून येतात.
रोग कसा पसरतो?
चांदीपुरा रोगाच्या प्रसारासाठी ‘सँडफ्लाय’ नावाचा कीटक जबाबदार आहे. हा कीटक घराच्या भिंतींच्या भेगा, जनावरांच्या शेडमध्ये आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळतो. आरोग्य विभागाने लोकांना त्यांच्या घराच्या परिसरात आणि विशेषत: जनावरांच्या शेडमध्ये स्वच्छता राखण्याबाबत प्रबोधन करण्याचे निर्देश दिले आहेत.
या विषाणूचा संसर्ग दुर्मिळ असल्याने, त्यावर अद्याप योग्य उपचार नाही. मात्र वेळीच या आजाराची लक्षणे समजल्यास योग्य उपचार सुरू केल्याने, तो गंभीर होण्याचा आणि मेंदूशी संबंधित विकार होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.
हेही वाचा:





