लाडकी बहीण योजनेवरून सुषमा अंधारेंचा अजित पवारांना टोला; म्हणाल्या…

नांदेड : राज्य सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहेत. आता या योजनेवरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला टोला लगावला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
लाडकी बहीण योजनेवरुन बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, की पंधराशे रुपयांची महिलांना गरज का पडते? मालक धडधाकट कमवतो, पण येताना पावशेर मारतो. आकडे खेळतो, अशा धंद्यातच त्याची सर्व कमाई जाते. जर एवढी काळजी असेल तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी या बहिणींचं कल्याण करण्यासाठी दारूचे धंदे बंद करावे असं आव्हान सुषमा अंधारे यांनी दिलं. दारूचे धंदे बंद झाले तर मायमावल्या पंधराशे मागणार नाही, महिला सुखी होतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
अजित पवारांना लगावला टोला
लाडकी बहीण योजना अजित पवारांनी जाहीर केली. ज्या माणसाने एक महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला, त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला काय अर्थ आहे? असा सवाल करुन सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.





