Sushma Andhare on Abhishek Ghosalkar – दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर बेछूट गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा या इसमाने पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्या असून त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर दहिसर येथील करुणा रुग्णालयात उपचार सुरु होते. अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या घटनेचा ठाकरे गटातील नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारी हे सरकारचे अपयश असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. सुषमा अंधारे म्हणतात, फडणवीस अपयशी | Sushma Andhare on Abhishek Ghosalkar पक्ष फोडाफोडी, सुडाचं राजकारण आणि तपास यंत्रणांचा गैरवापर यातून देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर यावं. स्वतःची मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा बाजूला ठेवून राज्यातील वाढती गुन्हेगारी कमी करण्याकडे लक्ष द्यावे अशी बोचरी टीका अंधारे यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात क्राईम रेट वाढतो, फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले असल्याचेही अंधारे म्हणाल्या. गोळीबाराच्या घटनेने ,महाराष्ट्र हादरला | Sushma Andhare on Abhishek Ghosalkar उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची घटना ताजी आहे. या घटनेमध्ये जखमी झालेले शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आणखी एक गोळीबाराची घटना घडल्याने महाराष्ट्रात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाढती गुन्हेगारी अन् नेतेमंडळी गुंडाच्या दारी गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेतेमंडळींच्या गुन्हेगारांसोबत गाठीभेटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आपल्या अधीकृत सोशल मीडिया खात्यावरून मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे फोटो पोस्ट आहेत. यामध्ये त्यांच्यासमवेत गुंडप्रवृत्तीची मंडळी दिसत आहेत. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील काही दिवसांपूर्वी पुण्यातील गुंड गजानन मारणे याची भेट घेताना दिसले होते. राजकीय नेतेमंडळी गुंडांसोबत गाठीभेटी घेत असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्था मात्र रामभरोसे असल्याचे दिसत आहे.