Sushma Andhare on Aniket Tatkare : चिपळूण येथील आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सावर्डे येथे उपस्थित राहिल्या होत्या. त्या खासगी हेलिकॉप्टरने सावर्डे येथे दाखल झाल्यानंतर पुढे विवाहस्थळापर्यंत चारचाकी वाहनाने गेल्या. मात्र या प्रवासादरम्यान घडलेल्या एका प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माहितीनुसार, गाडीत असलेल्या शासकीय चालकाला खाली उतरवून अनिकेत तटकरे यांनी स्वतः वाहनाचे स्टेअरिंग हाती घेतले. नुकत्याच घडलेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुषमा अंधारेंचा आरोप या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा होत आहे. अनिकेत तटकरे यांनी प्रोटोकॉलचे उल्लंघन केले असून याची चौकशी झाली पाहिजे. तसेच, “सुनील तटकरे यांचे चिरंजीव असल्यामुळे अनिकेत तटकरे यांना विशेष सवलत दिली जाते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी संबंधितांकडून स्पष्टीकरण घेतले जावे, अशी मागणी त्यांनी केली. अनिकेत तटकरेंचे स्पष्टीकरण दरम्यान, अनिकेत तटकरे यांनी या वादावर प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, हे वाहन शासकीय नव्हते, तर खासगी वाहन होते. सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून खासगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. “याआधीही अनेक वरिष्ठ नेत्यांचे सारथ्य केले आहे. कुटुंबातील सदस्य म्हणून स्वागत आणि वाहन चालवणे यात काही गैर नाही. अनावश्यकपणे या प्रकरणाला वादाचे स्वरूप दिले जात आहे,” असे ते म्हणाले. या घटनेमुळे राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून सुरक्षाव्यवस्थेच्या नियमांविषयी पुन्हा चर्चा रंगली आहे. पुढे याबाबत प्रशासन किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.