Sushant Singh Rajput : “सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही, याला उद्धव ठाकरे जबाबदार”; भाजप आमदाराचा गंभीर आरोप

Sushant Singh Rajput | Ram Kadam | Uddhav Thackeray : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर जवळपास 5 वर्षांनी हा रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतने आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. तसेच, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला या प्रकरणात क्लीन चीट देण्यात आली आहे. याशिवाय अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित दोन खटलेही बंद करण्यात आले आहेत.
त्यानंतर आता घाटकोपर पश्चिमेतील भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर अभिनेत्याच्या मृत्यूच्या चौकशीत निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. ‘त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या सरकारने जाणीवपूर्वक निष्काळजीपणा दाखवत बिहार पोलिसांना मुंबईत तपास करण्यापासून रोखले’, असे राम कदम म्हणाले.
“जेव्हा संपूर्ण देश सुशांत सिंह राजपूतचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करत होता, तेव्हा उद्धव ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक निष्काळजीपणा दाखवला. बिहार पोलिस तपासासाठी मुंबईत आले तेव्हा त्यांनाही रोखण्यात आले. कारण काय? उद्धव ठाकरे सरकारच्या लोकांना वाचवण्यासाठी सर्व पुरावे खोडून काढण्यात आले. ते सुशांतच्या मालकाला पुन्हा रंगवून देण्यात आले.” असं त्यांनी म्हंटल आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्याबद्दल राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण योग्य वेळी सीबीआयकडे सोपवले असते तर सुशांतच्या कुटुंबीयांना नक्कीच न्याय मिळाला असता. आज जर त्यांना न्याय मिळत नसेल, तर त्याला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे.” असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.





