Sushant Singh Rajput: रक्षाबंधन निमित्त सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचे भावुक पत्र….

Sushant Singh Rajput: रक्षाबंधनाच्या दिवशी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्ती भावनिक झाली. तिने सोशल मीडियावर आपल्या भावासोबतच्या जुन्या आठवणींचा व्हिडिओ शेअर करत एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलं. या व्हिडिओमध्ये सुशांत आपल्या बहिणीं सोबतचे हसरे, मस्तीने भरलेले क्षण अनुभवताना दिसतो. यात श्वेताच्या लग्नाच्या काही झलकांचाही समावेश आहे, ज्यात सुशांत तिच्या सोबत उभा आहे.
व्हिडिओसोबत श्वेताने लिहिलं, “कधी कधी असं वाटतं की तू कधी गेला नाहीस. तू अजूनही इथेच आहेस, फक्त पडद्यामागे, शांतपणे पाहतो आहेस. पण पुढच्याच क्षणी मनात वेदना दाटून येतात. खरंच मी तुला पुन्हा कधी पाहू शकणार नाही का? तुझ हास्य पुन्हा कधी पाहायला मिळणार नाही का? तुझा आवाज धूसर आठवणीतच अडकून राहील का?”
तिने पुढे लिहिलं, “तुला गमावण्याचं दुःख इतकं खोल, इतकं नाजूक आहे की त्यासाठी शब्द अपुरे पडतात”.
श्वेताने आपल्या भावासाठी प्रेमळ संदेश देत लिहिलं, “मला माहीत आहे, आपण पुन्हा भेटू. वेळेच्या आणि गोष्टींच्या पलीकडे, जिथे आत्मा प्रेमाच्या शांत भाषेत एकमेकांना ओळखतो. तोपर्यंत मी इथेच आहे, माझ्या मनात तुझ्या मनगटावर राखी बांधते आहे. जिथे कुठे असशील, तिथे आनंद, शांती आणि प्रकाश लाभो.”
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईतील बांद्रा येथील घरी मृत अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला, मात्र नंतर कुटुंबीयांच्या मागणीनुसार तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. अलीकडेच सीबीआयने अंतिम क्लोजर रिपोर्ट सादर करत सुशांतचा मृत्यू आत्महत्या असल्याचं स्पष्ट केलं असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचं नमूद केलं आहे.





