Road Accident : सूस-चांदे मार्गावर रसायन वाहतूक करणारा टँकर उलटला; डीपीचे नुकसान, जीवितहानी नाही
Road Accident : सूस-चांदे मार्गावर पहाटे तीनच्या सुमारास रसायन वाहतूक करणारा टँकर उलटला. सोसायटीच्या डीपीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

Road Accident : सूस-चांदे मार्गावर सुखवानी ग्रेसिया आणि विंडोज फेज-४ सोसायटीसमोर पहाटे सुमारे तीनच्या सुमारास रसायन वाहतूक करणारा टँकर उलटला. या अपघातात सोसायटीच्या वीज वितरण केंद्राचे (डीपी) मोठे नुकसान झाले. सुदैवाने पहाटेच्या वेळी रस्त्यावर रहदारी कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रेडिमिक्ससाठी लागणारे रसायन घेऊन जाणारा एमएच १२ एमव्ही ४१७३ क्रमांकाचा टँकर सूसकडून चांदेकडे जात होता. चढाच्या ठिकाणी हा टँकर अचानक बंद पडला. त्याचवेळी ब्रेक निकामी झाल्याने टँकर वेगाने मागच्या दिशेने सरकू लागला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने प्रसंगावधान राखत टँकर सोसायटीसमोरील रिकाम्या जागेत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, टँकरच्या मागील भागाची सोसायटीच्या डीपीला जोरदार धडक बसली. या धडकेत टँकर आणि डीपीचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर टँकर त्याच ठिकाणी उलटला.
पहाटेच्या शांततेत झालेल्या या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील रहिवासी घाबरून जागे झाले. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताचा पुढील तपास बावधन पोलीस करीत आहेत.





