Suryakumar Yadav Storm : टीम इंडियातून डच्चू अन् कर्णधारपद गेल्यानंतर सूर्या तळपला! अवघ्या २९ चेंडूंत साकारली ८२ धावांची वादळी खेळी
Suryakumar Yadav Storm : सूर्यकुमार यादव व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतला आहे. तो 'करा किंवा मरा' अशा मूडमध्ये दिसत असून, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संघाचा धुव्वा उडवत आहे.

Suryakumar Yadav 82 Runs Syed Mushtaq Ali Trophy Mumbai Beats Gujarat : भारतीय क्रिकेट संघातून डच्चू मिळाल्यानंतर आणि कर्णधारपद गमावल्यानंतर, सूर्यकुमार यादवने आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने निवड समितीला सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सूर्या अत्यंत आक्रमक आणि आर-पारच्या मूडमध्ये दिसत आहे. यापूर्वी मुंबईतील स्थानिक स्पर्धेत त्याने साधारण खेळ केला होता; मात्र गुजरातविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याने अवघ्या २९ चेंडूंत ८२ धावांची वादळी खेळी करत मुंबईला सलग दुसरा दमदार विजय मिळवून दिला.
चौकार आणि षटकारांची बरसात; सलग दुसऱ्या सामन्यात सूर्याचे रौद्ररूप
यापूर्वी हैदराबादविरुद्ध पहिल्या सामन्यात सूर्याने २१ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६० धावा कुटल्या होत्या. त्यापाठोपाठ आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने गुजरातविरुद्ध ९ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांच्या मदतीने २८३ च्या तुफानी स्ट्राईक रेटने ८२ धावा चोपल्या. त्याच्या या झंझावाती खेळीमुळे गुजरातचे गोलंदाज अक्षरशः हतबल झाले होते.
सर्फराझ खानचीही फटकेबाजी; १९८ धावांचे लक्ष्य अवघ्या १६ व्या षटकात पार –
🚨 Suryakumar Yadav show in SMAT:
SKY smashed 82 runs off just 29 balls while chasing a massive target of 198 against Gujarat.
60* (21) vs Hyderabad
82 (29) vs GujaratThis is strongest statement by SKY to the selectors 🥶🔥 https://t.co/wKNqBn00iw
— Indian Cricket Ministry (@Tejashyyyyyy) November 16, 2026
प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला शार्दुल ठाकूर आणि अथर्व अंकोलेकर यांच्या प्रत्येकी ३ विकेट्सच्या जोरावर मुंबईने १९७ धावांत सर्वबाद केले होते. प्रत्युत्तरात सूर्यासोबतच सर्फराझ खानने १७ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांची धडाकेबाज खेळी केली. शिवम दुबे अपयशी ठरूनही मुंबईने १५.४ षटकांत ५ बाद २०१ धावा करत विजय साकारला.
वर्ल्ड कप विजेता कर्णधार असूनही संघाबाहेर; पुनरागमनासाठी सूर्याचा जोरदार संघर्ष
विशेष म्हणजे, ८ मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक फायनल जिंकून देणारा कर्णधार असूनही सूर्याला नंतर संघातून वगळण्यात आले; आता या स्फोटक खेळींद्वारे तो टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.





