पुणे | खडकवासला विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण पथके तैनात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकवासला विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक, भरारी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक, व्हिडीयो पाहणी पथक स्थापन करण्यात आली आहेत.
निवडणूक विषयक कोणत्याही बाबींचा भंग होऊ नये यासाठी या पथकांद्वारे मतदारसंघातील विविध भागात बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.
सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट, आंबेगाव येथील आयोजित सर्व पथकांच्या बैठकीत डॉ. माने बोलत होते. यावेळी विविध पथकातील समन्वय अधिकाऱ्यांसह पथकातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक खर्च ताळमेळ समिती समवेत समन्वय ठेवून सर्व पथकांनी दिलेली जबाबदारी यथोचितपणे पार पाडावी, असे निर्देश डॉ. माने यांनी यावेळी दिले.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी, तसेच इतर संशयीत वाहनांवर देखील लक्ष ठेवून तपासणी करावी, वाहनांमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम सापडल्यास तसेच १० हजारांवरील मद्य,भेटवस्तू, अंमली पदार्थ, पोस्टर्स, इतर निवडणुक साहित्य वाटप करण्याच्या उद्देशाने उमेदवार,
प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते सापडल्यास सर्व साहित्य जप्त करण्यात यावे, १० लाखांपेक्षा अधिक रक्कम सापडल्यास तत्काळ आयकर विभागाला कळवावे, असे सांगून दिलेली जबाबदारी पार पाडताना कोणताही हलगर्जीपणा करू नये, कोणताही गैरप्रकार आढळल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉ. माने यांनी दिला.





