Surveen Chawla : अभिनेत्री सुरवीन चावलाचा कास्टिंग काऊच बद्दल मोठा खुलासा

बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊच हा विषय नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी यासंदर्भातील आपले अनुभव विविध मुलाखतींमधून उघड केले आहेत. याच पार्श्वभूमीवर, लोकप्रिय अभिनेत्री सुरवीन चावला हिने तिच्या कारकिर्दीतील एका अस्वस्थ करणाऱ्या अनुभवाचा खुलासा केला आहे.
आगामी वेब सीरिज ‘मंडला मर्डर्स’मधून प्रेक्षकांसमोर येणारी सुरवीन चावला हिने सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितले. ती म्हणाली, “एक काळ असा होता जेव्हा कास्टिंग काऊचसारख्या गोष्टी बॉलीवूडमध्ये सर्वत्र घडत होत्या. मला या गोष्टींचा भाग व्हायचं नव्हतं. त्या काळात कास्टिंग काऊच हा जणू ट्रेंडच बनला होता.”
सुरवीन पुढे म्हणाली की, या गोष्टींना नकार दिल्यामुळे तिला अनेक चांगल्या भूमिका गमवाव्या लागल्या. “मी अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा दिला नाही, त्यामुळे मला अनेक संधी गमवाव्या लागल्या. ही परिस्थिती खूपच त्रासदायक होती. मला नेहमी वाटायचं की, मी यासाठी बॉलीवूडमध्ये आले नाही,” असे तिने सांगितले.
यापूर्वी ‘हॉट्सफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीतही सुरवीनने एका धक्कादायक अनुभवाचा उल्लेख केला होता. ती म्हणाली, “मुंबईतील वीरा देसाई रोड येथे एका मिटिंगसाठी मी गेले होते. तिथे त्यांचे मोठे ऑफिस होते. ही घटना माझ्या लग्नानंतरची आहे.” तिने पुढे सांगितले, “मिटिंगदरम्यान माझं लग्न झाल्याचे त्यांना माहिती होते. त्यांनी माझ्या पतीबद्दलही विचारले होते. पण मिटिंग संपल्यानंतर, मी दरवाज्याजवळ असताना त्यांनी मला चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी तात्काळ त्यांना थांबवले आणि तिथून निघून गेले.”
सुरवीन चावला लवकरच ‘मंडला मर्डर्स’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज २५ जुलै २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी तिने ‘वेलकम बॅक’, ‘हिरो’, ‘हेट स्टोरी २’, ‘अगली’, ‘हिम्मतवाला’, ‘हम तुम शबाना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात टेलिव्हिजनवरील ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेतून केली होती. याशिवाय ‘हद से’, ‘सेक्रेड गेम्स’ यांसारख्या वेब सीरिज आणि पंजाबी तसेच तामिळ चित्रपटांमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.





