मुंबई इंडियन्सची शरणागती ! एकतर्फी सामन्यात गुजरात 55 धावांनी विजयी

अहमदाबाद -कर्णधार रोहित शर्मासह सर्व प्रमुख फलंदाजांनी केलेल्या अत्यंत सुमार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सला आयपीएल स्पर्धेत गुरुवारी गुजरात टायटन्सकडून 55 धावांनी पराभव पत्करावा लागला. या लढतीत मुंबईच्या निहाल वधेरा, कॅमेरुन ग्रीन व सूर्यकुमार यादवचा काहीअंशी अपवाग वगळता एकाही फलंदाजाला जबाबदारीने फलंदाजी करता आली नाही.
गुजरातने विजयासाठी दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. या संपूर्ण स्पर्धेत रोहित सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यानंतर इशान किशन व कॅमेरुन ग्रीन एकत्र आले. त्यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, इशानने आततायी फटका मारून 13 धावांवर असताना आपली विकेट गमावली. एका बाजूने ग्रीन चांगली फलंदाजी करत होता. मात्र, त्याला साथ देण्यासाठी आलेल्या तिलक वर्माने पुन्हा एकदा साफ निराशा केली.
यावेळी मुंबईच्या 3 बाद 45 धावा झाल्या होत्या. आता त्यांच्या संपूर्ण आशा ग्रीन व सूर्यकुमार यादव यांच्यावरच केंद्रित होत्या. यातच ग्रीनने आपली विकेट गमावली. त्याने 26 चेंडूत 3 षटकारांसह 33 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर लगेचच टीम डेव्हीडनेही निराशा केली. यावेळी सूर्यकुमार यादवही 12 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 23 धावा केल्या. निहाल वधेरा व पियुष चावला यांनी संघाचे शतक फलकावर लावले.
चावला 18 धावांवर परतला व अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली. मात्र, स्थिरावलेला वधेरा 40 धावांवर बेजबाबदार पद्धतीने फटका मारून परतला. त्याने या खेळीत 21 चेंडूत 3 चौकार व 3 षटकार फटकावले. यावेळी मुंबईला 2 षटकांत 69 धावांची गरज होती. अखेरच्या षटकात अर्जुनही बाद झाला व मुंबईला 55 धावांनी पराभव पत्करावा लागला.
तत्पूर्वी,शुभमन गिल, डेव्हीड मिलर व राहुल तेवतिया यांनी केलेल्या अफलातून आक्रमक फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 208 धावा करण्याचे मोठे आव्हान ठेवले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत गुजरातला पहिल्यांदा फलंदाजी दिली. अर्जुन तेंडुलकने सलामीवीर वृद्धिमान साहाला बाद करत पहिले यश मिळवून दिले. त्त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यासह प्रमुख फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले.
विजय शंकरनेही निराशा केली. मात्र, एका बाजूने शुभमन गिलने अर्धशतकी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. डेव्हीड मिलरने संघाचे शतक फलकावर लावले. गिलने आपली विकेट गमावली. त्याने आपल्या 56 धावांच्या खेळीत 34 चेंडूत 7 चौकार व 1 षटकार फटकावला. तो परतल्यावर अभिनव मनोहरने मिलरला साथ देत संघाचे दीडशतक फलकावर लावले. मात्र, स्थिरावल्यानंतरही मनोहर 42 धावांवर बाद झाला. त्याने 21 चेंडूत 3 चौकार 3 षटकार फटकावले.
यानंतर मिलरही अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने 46 धावांची खेळी करताना 22 चेंडूत 2 चौकार व 4 षटकार फटकावले. त्याने राहुल तेवतियाच्या साथीत संघाला द्विशतकी मजल मारून दिली. गुजरातने सुरुवातीच्या घसरणीनंतरही 20 षटकांत 6 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभारला. तेवतिया अवघ्या 5 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 20 धावांवर नाबाद राहिला. रशीदन खानने नाबाद 2 धावा केल्या.
गिलने साजरा केला आनंद
गुजरातचा सलामीवीर शुभमन गिल याने या लढतीत अर्धशतकी खेळी करत आपला आनंद साजरा केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी भारतीय संघात गिलचा समावेश करण्यात आल्याचे वृत्त त्याला समजले व त्याने याच आनंदात अफलातून फलंदाजी केली.
लक्षवेधी
गुजरातचा कर्णधार पंड्या अपयशी
शुभमन गिलचे अर्धशतक
अर्जुनची खडूस गोलंदाजी
मिलर व मनोहरने सावरले
रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी
इशान किशन व तिलक वर्माकडूनही निराशा
ग्रीन व सूर्यकुमारकडूनही अपेक्षाभंग
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स – 20 षटकांत 6 बाद 207 धावा. (शुभमन गिल 56, डेव्हीड मिलर 46, अभिनव मनोहर 42, राहुल तेवतिया नाबाद 20, पियुष चावला 2-34, अर्जुन तेंडुलकर 1-9). मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 9 बाद 152 धावा. (निहाल वधेरा 40, कॅमेरुन ग्रीन 33, सूर्यकुमार यादव 23, पियुष चावला 18, अर्जुन तेंडुलकर 13, नूर अहमद 3-37, रशीद खान 2-27, मोहित शर्मा 2-38).





