सुरेश वाडकर यांच्या अकादमीवर नियमभंगाचा ठपका: शासकीय भूखंडाचा गैरवापर?

मुंबई – सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या ‘आचार्य जियालाल वसंत संगीत निकेतन ट्रस्ट’ला (आजिवसन) भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी सरकारने दिलेल्या भूखंडाचा गैरवापर झाल्याचा गंभीर ठपका मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेवला आहे. जुहू तारा रोड येथील या भूखंडावर गुरुकुल अकादमीसोबतच विनापरवानगी निवासी वापर आणि आंतरराष्ट्रीय शाळेसाठी जागा भाड्याने देण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे आदेश मागितले आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, वाडकर यांच्या ट्रस्टने शासकीय भूखंडाचा वापर मूळ उद्देशापेक्षा वेगळ्या पद्धतीने केला आहे. तहसीलदारांच्या अहवालात नमूद केल्यानुसार, ट्रस्टने भूखंडावर ‘बिलबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल’ सुरू केले असून, 2006 पासून शाळेसोबत विनापरवानगी भाडेकरार केला आहे. याशिवाय, भूखंडाचा काही भाग निवासी वापरासाठीही वापरला जात असल्याचे आढळून आले. हे सर्व प्रकार मूळ जमीन प्रदान आदेशातील अटी आणि शर्तींचा भंग करणारे असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने नमूद केले आहे.
भूखंडाची पार्श्वभूमी –
2003 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे सुरेश वाडकर यांनी भूखंडासाठी विनंती केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने पडताळणी करून जुहू येथील 8,260 चौ. फूट (सिटी सर्व्हे क्र. 1052, भूखंड क्र. 3) भूखंड ट्रस्टला दिला. पुढे गुरुकुलच्या विस्तारासाठी वाडकर यांनी पुन्हा विनंती केल्यानंतर लगतचा 8,070 चौ. फूट (भूखंड क्र. 4) भूखंड 9 एप्रिल 2003 रोजी प्रदान करण्यात आला. या भूखंडांवर ट्रस्टने दोन इमारती उभारल्या आहेत. मात्र, या जागेचा वापर मूळ हेतूबाह्य झाल्याचा आरोप आता समोर येत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने शर्तभंगाच्या या प्रकरणात पुढील कारवाईसाठी राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे. ट्रस्टने केलेल्या अनधिकृत वापरामुळे भूखंडाच्या कब्जेहक्कावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाने शास्त्रीय संगीताच्या जतनासाठी दिलेल्या भूखंडाच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुरेश वाडकर यांच्यासारख्या ख्यातनाम कलाकाराच्या संस्थेवर झालेल्या या आरोपांमुळे परिसरात आणि संगीत क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ट्रस्टकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



