Suresh Dhas : हा व्यक्तीच खरा ‘आका’ आहे ! सुरेश धस यांचा मोठा खुलासा; बीड जिल्ह्यातील ‘आका’चे नाव आले समोर

Suresh Dhas | Walmik Karad : संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीकडून १५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या करण्यात आली आहे. हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचे त्यात म्हणण्यात आले आहे.
पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून ही माहिती समोर आली असून संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा, असा मेसेज वाल्मीक कराडने विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेला दिला होता, हे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जे आरोप आणि दावे वाल्मीक कराडबद्दल केले जात होते, ते पोलिसांनी तपासाअंती दाखल केल्या आरोपपत्रात सत्य ठरवण्यात आले आहेत.
संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली आणि वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून हे हत्याकांड घडल्याच्या दाव्यांना आरोपपत्रातून पुष्टी मिळाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सुरेश धस म्हणाले की, ‘वाल्मिक कराड हा मास्टर माइंड, मुख्य सूत्रधार आणि आका सर्व काही तोच आहे. हा आकाच सर्व काही करत होता. संपूर्ण बीड जिल्ह्यात यांनी धुमाकूळ घातला होता. गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत त्यांना मदत करणं, पैसा पुरवणं. पैसा जास्त झाला.
बोगस पैसे उचलायचे आणि गँग तयार करायच्या, टोळ्या पकडायच्या. त्यांना अभय द्यायचं. त्यांच्याकडून पाहिजे ती कामे करून घ्यायची. अशा पद्धतीचा यांचा उद्योग होता. त्यामध्ये वेगळं काही नाही.
एसआयटीने जे मांडलं ते योग्य आहे. यांच्या हा सूत्रधार जो आहे, वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहे. बाकीचे प्यादे आहेत. एसआयटीने एकत्रित जंत्री केलेली दिसते, कलम ३४ प्रमाणे सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे.
खून करायला जरी प्रत्यक्ष वाल्मिक कराड त्या जागेवर नसला तरी त्याच्या आदेशानेच खून झाला आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे.” अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी यावेळी दिली.





