School Friendship : शाळा सुटली, पाटी फुटली; 13 वर्षांनंतरही मैत्रीचा धागा कायम!
School Friendship : नेवासा तालुक्यातील सुरेगावच्या जिल्हा परिषद शाळेतील २०११-१२ च्या माजी विद्यार्थ्यांचे १३ वर्षांनंतर स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

School Friendship : शाळा संपली, शिक्षणाच्या वाटा वेगळ्या झाल्या, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात रमला; मात्र बालपणीच्या मैत्रीचे नाते आजही कायम आहे. याचा सुंदर अनुभव नेवासा तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनातून आला.
सन २०११-१२ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवारी (दि. १४) नेवासा फाटा येथील हॉटेल कृष्णा येथे उत्साहात पार पडले. तब्बल १३ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने आनंदाला उधाण आले. शाळेतील गंमतीजमती, खेळ, डबा वाटून खाणे आणि शिक्षकांनी केलेल्या शिक्षेच्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.
या कार्यक्रमाला भगत मॅडम आणि गायकवाड मॅडम उपस्थित होत्या. माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सन्मान करून आशीर्वाद घेतले. अनेक वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांना भेटून शिक्षकांनीही आनंद व्यक्त केला.
स्नेहसंमेलनात संगीत खुर्ची, गायन आणि विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दिलीप शिंदे आणि हिना भोसले यांनी सूत्रसंचालन केले.
दरवर्षी भेटण्याचा संकल्प –
मोबाईलच्या काळात प्रत्यक्ष भेटीचा आनंद वेगळाच असतो. हे स्नेहसंमेलन दरवर्षी आयोजित करण्याची इच्छा माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शाळा सुटली, पाटी फुटली; पण मैत्री मात्र कायम राहिली, याचीच प्रचिती या भेटीतून आली.





