सुरतमधील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांनी अखेर सोडले मौन, म्हणाले ‘पक्षाने विश्वासघात…’

Surat Lok Sabha Elections 2024| गुजरातमधील काँग्रेसचे निलंबित नेते नीलेश कुंभानी यांनी 20 दिवसांनंतर केलेल्या वक्तव्याने राजकीय खळबळ उडाली आहे. कुंभानी यांनी शनिवारी 11 मे रोजी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुरत लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर आता 2017 मध्ये पक्षाने आपला विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.
कुंभानी म्हणाले की, “पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शक्तीसिंह गोहिल आणि पक्षाचे राजकोट लोकसभा उमेदवार परेश धनानी यांच्याबद्दल आदर म्हणून आपण इतके दिवस मौन बाळगल्याचे कुंभानी म्हणाले. ते म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते माझ्यावर विश्वासघाताचा आरोप करत आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सुरतमधील कामरेज विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या क्षणी माझे तिकीट कापले गेले तेव्हा काँग्रेसनेच माझा पहिला विश्वासघात केला.”
पुढे ते म्हणाले, “मला हे करायचे नव्हते, पण सुरतमधील पाच स्वयंघोषित नेत्यांकडून पक्ष चालवला जात असल्याने माझे समर्थक, कार्यालयीन कर्मचारी आणि कार्यकर्ते नाराज झाले. इतर पक्षाच्या नेत्यांना सुरतमध्येही काम करू दिले जात नाही, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस ‘इंडिया’ युतीचा भाग आहे. पण मी आम आदमी पक्षाच्या नेत्यांसोबत प्रचार करत असताना या नेत्यांनी आक्षेप घेतला होता.”
नेमकं काय घडलं होतं?
कॉंग्रेसने कुंभानी यांना सूरत लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, काही विसंगती आढळल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. तर, इतर इतर उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.
उमेदवारी अर्जावरील स्वाक्षऱ्या आमच्या नसल्याचा दावा ३ सूचकांनी केला. कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यामागील ते प्रमुख कारण ठरले. तर्क-वितर्कांना उधाण आल्यानंतर कॉंग्रेसने कुंभानी यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले. त्यासाठी त्यांना पक्षाच्या गुजरात शाखेच्या शिस्तपालन समितीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यांनी पक्षाशी असणारा संपर्क तोडला. अखेर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यानंतर त्यांनी कॉंग्रेसवर गंभीर आरोप केले.
हेही वाचा:
‘लागीर झालं जी’ मालिकेतील अभिनेता नितीश चव्हाण पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस





