फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; ‘या विषयाच्या मूळाशी…’

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये या डॉक्टर तरुणीने जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये, डॉक्टरने दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे नमूद केली असून त्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट केलं आहे.
मृत डॉक्टरने तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी तिच्यावर पाच वेळा बलात्कार केल्याचं आणि पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी चार महिने शारीरिक व मानसिक छळ केल्याचं म्हटलं आहे. या दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं नोटमध्ये नमूद आहे. या घटनेनंतर गोपाळ बदने सध्या फरार आहे.
या गंभीर प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत राज्याच्या गृह विभागावर टीका केली आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करण्याची मागणी केली.
फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली…
— Supriya Sule (@supriya_sule) October 24, 2025
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “या महिलेने सुसाइड नोटमध्ये तिचा शारिरिक आणि मानसिक छळ होत असल्याची तक्रार वारंवार वरीष्ठांना कळवली होती, पण तिची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं.”
“या विषयाच्या मूळाशी नेमकं कोणतं कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणं आवश्यक आहे.”असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी तातडीने चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या आणि राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त करत, “पोलीसच असा अत्याचार करत असतील, तर महिलांनी न्याय मागण्यासाठी जायचं कुठं?” असा सवाल केला आहे. त्यांनीही दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.





