Supriya Sule : केंद्राकडे अहवाल का पाठविला नाही? सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल

प्रभात वृत्तसेवा
पुणे – अतिवृष्टीने शेतकरी पिचले असले तरी याबाबतचा अहवाल केंद्राकडे पाठवला आहे की नाही, याची सरकारने माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केली. त्या म्हणाल्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच राज्याने मदतीसाठी अहवाल पाठवला नसल्याचे जाहीर सभेत सांगितले आहे. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी केंद्राकडे मदत मागितली की नाही, हा प्रश्नच आहे. सरकारने अहवाल का पाठवला नाही, हे जाहीर करावे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवायच्या की नाही, हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील. निवडणुका कधी होणार हे माहिती नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, ऐन दिवाळीच्या तोंडावर सुमारे २५ लाडक्या बहिणींची नावे योजनेतून वगळण्यात आली. गोरगरिबांचा आनंदाचा शिधा बंद केला आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. संशोधनक विद्यार्थी आंदोलन करतात.
शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. राज्य सरकारकडून कोणतीच मदत केलेली नाही.बारामती लोकसभा मतदार संघातील महावितरण आणि महापारेषणच्या वीज यंत्रणेच्या आढावा बैठकीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.




