सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट ; सुप्रिया सुळे म्हणतात,….

जळोची : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. त्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघामधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार असल्याचे मानलं जातंय. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालीय.
असे असतानाच काल रात्री बारामती तालुक्यातील जळोची येथील काळेश्वर मंदिरात खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांची भेट झाली. या भेटीदरम्यान दोघींनी गळाभेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
गळाभेटीवर बोलताना सुळे म्हणाल्या की, सुनेत्रा पवार ह्या माझ्या मोठ्या भावाची बायको आहे. माझ्या वहिनी आहेत. माझ्यावर झालेल्या संस्कारामुळे ,माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या माणसाला जेव्हा आपण भेटतो. तेव्हा त्याचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. माझ्यावर माझ्या आईने जे संस्कार केले आहेत. त्या रीतीनेच मी वागणार अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार का या प्रश्नावर बोलताना सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकतीने लढवणार आहोत. ग्रामपंचायत पंचायत, समिती, जिल्हा परिषद या निवडणुका कशा लढवायच्या ते आमचे वरिष्ठ ठरवतील. विधानसभा आणि लोकसभा याच्यात महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढू” असे त्यांनी सांगितले.





