Supriya Sule : “तुमच्या वाचाळवीरांना आवरा!”; सुप्रिया सुळेंचा थेट मुख्यमंत्र्यांना सल्ला, भाजपच्या बदललेल्या भाषेवर टीका

प्रभात वृत्तसेवा
पुणे – ‘ना खावूंगा, ना खाने दुंगा’, पारदर्शक कारभार करून भाजपा भ्रष्टाचारमुक्त भारत करणार होते. मात्र, आज भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार वाढला असून, त्यामध्ये पुणे हे सगळ्यात भ्रष्टाचारी शहर नोंदविले असून, हा अहवाल माझा नसून भारत सरकारने दिलेला अहवाल सांगतो, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत याची जबाबदारी भाजपला घ्यावी लागेल, असेही सांगितले.भाजपा हा सुसंस्कृत पक्ष होता. त्याची भाषा, विरोधकांचा मानसन्मान लोकशाही पद्धतीने केला जात होता.
मात्र, गेल्या काही वर्षांत भाजपमध्ये आलेली नवी भाषा मला अस्वस्थ करते. त्यामुळे कटुता वाढवू नका, तुमच्या वाचाळवीरांना महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि ऐक्यासाठी वेळीच आवरा, असा सल्लाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. ज्या जिल्ह्यात मुख्यमंत्री आठवड्यातून दोनदा येतात, त्या जिल्ह्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पोलिसांवर हल्ले होणे दुर्दैवी आहे.दरम्यान, राज्यात आत्महत्या वाढतात, हे सरकारचे अपयश आहे.
निवडणुकीत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू, असे अश्वासन दिले होते. मात्र, आता पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, असे अश्वासन दिले, मात्र अजूनतरी पैसे आलेले मी एकले नाही, त्यामुळे गोड कसली ही काळी दिवाळी आहे, असे बोलावे लागते हेच दुर्दैवी आहे. मतदार यादीतील घोळाबाबत महाविकास आघाडीने घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून भाजपने केलेल्या टीकेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मतदार यादीत घोळ आहे का तर आहेच.
हा फक्त आरोप नाही तर डेटा सांगतो. मात्र, त्यांना वास्तवतेत जगायचेच नसेल तर त्यावर आम्ही काय बोलणार. मतदार यादी पारदर्शकपणे झालीच पाहिजे. मतदार यादीच जर जागेवर नसेल तर सरकार इलेक्शन कशी घेणार. काॅपी करून पास होणे आणि कष्ट करून पास होणे यात अंतर असल्याचे सांगत सुळे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.





