मेरीटवर पास झाल्याने मीच बारामतीची खासदार – सुप्रिया सुळे

मलठण – बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने मला गेली पंधरा वर्षे लोकसभेत प्रामाणिकपणे काम करण्याची संधी दिली. संसदेत अनेक प्रश्न उपस्थित करून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. संसदेत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे मला सात वेळा उत्कृष्ट संसद पटृटु पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे मी मेरीटवर पास झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही मीच बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार होणार हा मला आत्मविश्वास आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील लोणारवाडी, शिंगाडेवाडी, बोरीबेल, काळेवाडी, मलठण, पेडगाव, वडगाव, शिरापूर, देऊळगाव राजे, हिंगणीबेर्डीत गाव भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार सुळे म्हणाल्या की, कांदा, दूध, आदी अनेक पिकांच्या पडलेल्या बाजारभावावर केंद्र सरकार काहीच बोलायला तयार नाही. दुसरीकडे यावर्षी निसर्गाने अवकृपा केल्याने अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. जिरायती भागात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. या प्रश्नांवर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
खासदार सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील मराठी माणसाचे दिल्ली दरबारी खच्चीकरण केले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयावर कॅग ने ताशोरे ओढले आहेत. इतर मंत्रालयाची चौकशी केली जात नाही. मराठी माणसाचा आवाज दाबला जात आहे. असे टीकास्त्र त्यांनी केंद्र सरकारवर सोडले.
यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले, अजित बलदोटा, नगरसेवक बादशाह शेख, माजी सभापती ताराबाई देवकाते, उज्ज्वला शेळके, ज्ञानदेव चव्हाण, भाऊसाहेब देवकाते, शशिकांत शेळके, नवनाथ थोरात आदी पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.





