सुप्रीम कोर्टाची ‘ना-ना’; भटक्या कुत्र्यांवरील याचिका फेटाळली, स्पष्टच सांगितलं….
Supreme Court – दिल्लीतील भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर दाखल करण्यात आलेल्या नवीन याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ही याचिका दिल्ली महापालिकेने भटक्या कुत्र्यांना उचलण्याविरुद्ध दाखल केली गेली होती.
याचिकाकर्त्याच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने या प्रकरणात न्यायालयाकडून त्वरित सुनावणी घेण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता एमसीडीने भटक्या कुत्र्यांना उचलून त्यांना आश्रयगृहात ठेवण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे असा युक्तिवाद वकिलाने केला.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने अगोदरच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला आदेश म्हणजेच भटक्या कुत्र्यांना उचलून त्यांना आश्रयगृहात ठेवण्याच्या सूचना कायम ठेवाव्यात की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मात्र त्यापूर्वीच काढण्यात आलेली एमसीडीची अधिसूचना न्यायालयीन प्रक्रियेचे उल्लंघन आहे असा दावाही याचिकेत करण्यात आला.
यापूर्वी, ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती जेबी पारडीवाला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने आदेश दिला होता की दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवावे आणि त्यांना पुन्हा रस्त्यावर सोडू नये. या निर्णयावरून सध्या दिल्लीत आणि अन्यत्रही मोठा गदारोळ सुरू आहे.





