नेवासा: गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे मोकळा झाला आहे. पुढील चार महिन्यांमध्ये या निवडणुका घेण्याची तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली असल्यामुळे आता पुन्हा पावसाळा आला असल्याचे कारण पुढे करुन या निवडणुकापुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेत गुंडाळल्या गेल्या होत्या. मार्च २०२२ मध्ये या निवडणुकांना स्थगितीही मिळालेली असल्यामुळे या निवडणुकांचे भिजत घोंगडे जैसे थेच पडून होते. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी उदासिनता आणि मरगळ आली होती, अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे या निवडणुकांची अधिसूचना जारी होणार असल्यामुळे राजकीय नेतेमंडळी आपल्या आखाड्यात जनतेचा व्होरा ओळखून तयारी करत आहेत. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक मंडळी आपला गण आणि गटाचा राजकीय कयास ओळखून आपले राजकीय बस्तान बसविण्यासाठी चाचपणी करण्यात दंग झाले आहेत. ऐरवी नमस्कार-चमत्कार बंद केलेल्या पुढाऱ्यांचे आता अचानकपणे हातवर होवू लागले आहेत. त्यामुळे गावपातळीवर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणूसकीला मोठा पाझर फुटू लागल्याचे दिसून येवू लागले आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या लोकप्रतिनिधींची मुदत संपल्यानंतर पर्यायाने तालुका पातळीवर गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या हातातच सत्तेचा अस्पष्टरित्या कासरा आला आहे. अनेक कामे मनमानीपणे होत असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारीच नेमके माजी होवून बसल्यामुळे त्यांची बोलतीच बंद झाल्यामुळे हा खेळ माजी पदाधिकाऱ्यांना निमुटपणे पाहण्याची नामुष्की या पदाधिकाऱ्यांवर येवून ठेपलेली होती. आता सर्वोच्च न्यायालयाच्या या दणक्यामुळे निवडणूका होणार असल्याने अचानक राजकीय वारे आणि माणुसकीचे दर्शन नेवासा तालुक्यात दिसू लागले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून अधिक काळ प्रशासकांची राजवट सरकारी कार्यालयात सुरू असल्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानी प्रवृत्तीला सामान्य जनता वैतागल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुका होणार असल्याचे वृत्त पसरताच नेतेमंडळींसह सर्वसामान्य जनता बेहद खुष झाली असल्याचे दिसून येत आहे. आता राजकीय फडात कलगीतुऱ्याची रंगत येणार असून या निवडणुकांमुळे राजकीय फडात झुंज देण्यासाठी पुढारी आता प्रयत्नांची पराकष्ठा करतांना दिसून येणार असल्याचा राजकीय रागरंग दिसून येत आहे.