Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात तीन नवे न्यायाधिश; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली शपथ

Supreme Court : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शुक्रवारी न्या. एन. व्ही. अंजारिया, न्या. विजय बिश्नोई आणि न्या. ए. एस. चांदुरकर यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात हा कार्यक्रम झाला. न्यायाधीशांच्या शपथविधीसह, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता ३४ झाली आहे. त्यामुळे आता न्यायाधिशांची एकही जागा रिक्त नाही.
यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बिश्नोई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चांदुरकर यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.
कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी 10 तारखेला त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या. अभय ओक आणि न्या. हृषिकेश रॉय यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या तीन विद्यमान रिक्त पदांसाठी त्यांची नावे शिफारस करण्यात आली.
१. न्या. एन. व्ही. अंजारिया
न्यायाधीश अंजारिया यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. यापूर्वी २१ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांना गुजरात उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. ६ सप्टेंबर २०१३ रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांचे नाव मंजूर करण्यात आले.
२३ मार्च १९६५ रोजी अहमदाबाद येथे जन्मलेले न्यायमूर्ती अंजारिया यांनी १९८९ मध्ये अहमदाबाद येथील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉ मधून कायद्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. ऑगस्ट १९८८ पासून त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी सर्व श्रेणी, कामगार आणि सेवा बाबींमधील संवैधानिक मुद्दे आणि दिवाणी प्रकरणे हाताळली.
२. न्या. विजय बिश्नोई
न्या. बिश्नोई यांनी ५ फेब्रुवारी २०२४ रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. ८ जानेवारी २०१३ रोजी त्यांची राजस्थान उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ७ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. २६ मार्च १९६४ रोजी जोधपूर येथे जन्मलेले न्या. बिश्नोई ८ जुलै १९८९ रोजी वकिली म्हणून नोंदणीकृत झाले. त्यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि जोधपूर येथील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात वकिली केली.
३. न्या. अतुल एस. चांदुरकर
७ एप्रिल १९६५ रोजी जन्मलेले न्या. चांदुरकर कायद्याची पदवी घेतल्यानंतर २१ जुलै १९८८ रोजी बारमध्ये सामील झाले. न्यायमूर्ती चांदुरकर १९९२ मध्ये नागपूरला गेले आणि विविध न्यायालयांमध्ये वकिली केली. २१ जून २०१३ रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.





