नवी दिल्ली : आजवर जवळपास प्रत्येक चित्रपटात कानून अंधा होता है, हा डायलॉग आणि डोळ्यांना पट्टी बांधलेली न्यायदेवता हे दृश्य आपण नेहमीच पाहतो. पण आता हे बंद होणार आहे. कारण आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी आता काढण्यात आली असून तसा निर्णय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी घेतला आहे. तसेच न्यायदेवतेच्या दुसऱ्या हातात असलेली तलवार देखील हटवण्यात आली असून तिथे राज्यघटनेचे पुस्तक म्हणजे संविधान असेल, असाही बदल त्यांनी केला आहे. भारतात नुकताच ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानंतरचा हा मोठा बदल होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हा निर्णय घेतला आहे. आता ब्रिटिशांच्या प्रभावातून पूर्णपणे बाहेर येत भारतीय न्यायव्यवस्था नवीन रूप घेताना दिसते आहे. कायदा कधीच आंधळा नसतो, तो सर्वांना समान दृष्टीने पाहतो. यामुळेच न्यायदेवतेचे स्वरूप बदलण्यात यावे, असा सरन्यायाधीशांचा आग्रह होता. यासोबतच देवीच्या हातात तलवार नाही तर संविधान असायला हवे. यामुळे न्यायदेवता संविधानाप्रमाणे न्याय करते, हे लक्षात येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. तलवार ही हिंसेचे प्रतीक आहे. न्यायालय हिंसाचार नाही तर कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे न्याय करतात. तर दुसऱ्या हातात असलेला तराजू योग्य आहे, कारण तो समानतेने न्याय करतो, अशी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची धारणा आहे. याच आधारे न्यायदेवतेची नवीन मूर्ती बनवून घेण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या सूचनेनुसार न्यायदेवतेची मूर्ती पुन्हा बांधण्यात आली आहे. ही मुर्ती सर्वप्रथम न्यायाधीशांच्या वाचनालयात बसवण्यात येणार आहे. न्यायदेवतेची मूर्ती भारतात कोठून आली? न्यायाची देवी ही एक प्राचीन ग्रीक देवी आहे, जी न्यायाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. तिचे नाव जस्टीया आहे. त्यांच्या नावावरून न्याय हा शब्द तयार झाला. त्यांच्या डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीचाही खोल अर्थ आहे. डोळ्यावर पट्टी बांधली जाणे म्हणजे न्यायदेवता नेहमी नि:पक्षपातीपणे न्याय देईल. एखाद्याला पाहून त्यांना न्याय देणे पक्षपाती असू शकते. त्यामुळे त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती. ही मुर्ती ग्रीसमधून ब्रिटनमध्ये पोहोचली.17 व्या शतकात ब्रिटीश अधिकाऱ्याने ती पहिल्यांदा भारतात आणली होती. तेव्हा भारतात ब्रिटिश अधिकारी कोर्ट ऑफिसर होते. 18 व्या शतकात ब्रिटिश काळात न्याय देवीची मूर्ती सार्वजनिक वापरात आणली गेली. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर आपणही न्यायदेवतेचा स्वीकार केला.