“महाराष्ट्रातील सध्याच्या गुडघेटेकु मुख्यमंत्र्यांनी ‘हा’ बाणा समजून घेतला पाहिजे”

मुंबई – महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपला सोडत इतर पक्षांशी हात मिळवणी केली. यानंतर नुकतेच सत्तेत बाहेर पडलेल्या शिवसेनेने नितीश कुमार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत ‘नितीशकुमार आगे बढो’ अशी हाक दिली आहे. मुखपत्र असलेल्या सामनामधून शिवसेनेने नितीशकुमारांची जोरदार पाठराखण केली आहे.
बिहारात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ झाली आहे. बिहारातदेखील महाराष्ट्राप्रमाणेच ‘शिंदे’ गट वेगळा करून भाजपचे दिल्लीश्वर नितीश कुमार यांना मात देण्याचे कारस्थान करीत होते. त्यासाठी नितीश कुमार यांचे ‘शिंदे’ आर.सी.पी. सिंग यांना हाताशी धरून पोखरापोखरीचे काम सुरूच केले होते, पण नितीश कुमार यांनी भाजपलाच धोबीपछाड देणारी पलटी मारली आहे. असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.
बिहारात भाजपबरोबरची युती तोडल्याचे ‘जेडीयू’ने मंगळवारी जाहीर केले. नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मंगळवारी राजीनामा सोपवला. बुधवारी नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाची तर ‘राजद’चे तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नव्या ‘महागठबंधन’ सरकारमध्ये जदयू, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेससह इतर घटक पक्षांचा सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष विश्वासघातकी असल्याचे मत ‘जेडीयू’ने व्यक्त केले. भाजप नितीश कुमार यांच्या पक्षालाच सुरुंग लावायला निघाला, पण तो खेळ भाजपवर उलटला असल्याचे सामनात म्हंटले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात ‘जेडीयू’चे राज्यसभा सदस्य आर.सी.पी. सिंग यांचा समावेश नितीश कुमार यांच्या मनाविरुद्ध होता, पण सिंग यांना बळ देऊन भाजपास बिहारात नितीश कुमारांना अस्थिर करायचे होते. हे लक्षात येताच नितीश कुमार यांनी दिल्लीशी संपर्कच तोडला. दिल्लीशिवाय आपले काही अडत नाही हे दाखवले व मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बोलावलेल्या किमान पाच बैठकांना गैरहजर राहिले. महाराष्ट्रातील सध्याच्या गुडघेटेकु मुख्यमंत्र्यांनी हा बाणा समजून घेतला पाहिजे असे खडेबोल सामनातून सुनावण्यात आले आहेत.





