पुणे | आम्हाला पाठबळ द्या, रक्कम वाढवतो

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लाडक्या बहिणींनी आम्हाला पाठबळ दिले तर दीड हजारांचे दोन हजार होतील, अडीच आणि तीन हजारदेखील होतील. तुम्ही ताकद दिली, तर तीन हजारांच्या पुढेही रक्कम देता येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुण्यातील कार्यक्रमात दिली.
त्याचप्रमाणे या योजनेसाठी सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भरला तरी त्यांना जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांची रक्कम दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, योजनेसाठी अनेकांनी विघ्न आणले. अर्ज रद्द व्हावे म्हणून प्रयत्न केले गेले. या लोकांनी पोर्टवरल जंक डेटा टाकला. त्यामुळे पोर्टल पाच सहा दिवस बंद होते. मात्र आम्ही आॅफलाइन अर्ज स्वीकारले. तुम्ही आशीर्वाद दिला तर २०२५ पर्यंत काय २०२७ पर्यंत आर्थिक व्यवस्था करू.
पण बजेटमध्ये एकच वर्षाची तरतूद करावी लागते. तशी सोय असती, तर आम्ही पाच वर्षांची तरतूद केली असती. भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील सर्व योजना सुरू आहेत. पण काँग्रेसने कर्नाटकात योजना सुरू केली पण नंतर बंद केली, असा टोला त्यांनी त्यांनी लगावला.
अजित पवार म्हणाले, तुम्ही पुन्हा महायुतीला पाठबळ द्या. पुन्हा संधी द्या. पुढच्या पाच वर्षांत तुम्हाला ९० हजार हजार रु. देण्याचे काम करणार आहोत. आम्ही कामाचे माणसे आहोत. शब्दाला पक्के आहोत. जे बोलतो ते करतो.
वेळ मारून नेणारे नाही. विरोधक अधूनमधून टीका करतात. त्याकडे लक्ष देऊ नका. लोकसभेतही संविधान बदलणार असे खोटंनाटे सांगितलं. आता त्याला बळी पडायचे नाही. हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत. ते परत घेण्यासाठी दिलेले नाही. हा तुमचा हक्क आहे.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका केली जात आहे. पण, त्यांना इतकी पोटदुखी होण्याचं काय कारण? महिलांनी या टीकेकडे दुर्लक्ष करावे.
विधानसभा निवडणुकीसाठी भावनिक साद
लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणे हे आपल्या हातात आहे. पुन्हा एकदा संधी द्या. तुम्ही आशीर्वाद दिला तर या योजनेसाठी पुढील पाच वर्षांची आर्थिक व्यवस्था केली जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना योग्य वेळी योग्य जागा दाखवा आणि जोडा दाखवा, अशी भावनिक साद घालत अनुक्रमे अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी थेट येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ देण्याचे आवाहन या वेळी महिलांना केले.
आतापर्यंत अनेकांना पुरून मी उरलो आहे. सावत्र कपटी भावावर मात करून आम्ही इथपर्यंत आलो आहे. त्यांना केवळ लक्षात ठेवा त्यांना निवडणुकीत जागा दाखवून द्या. तोंडाला फेस येईपर्यंत आम्ही फेसबुक लाइव्ह केले नाही.
आमच्यावरील टीका आम्ही सहन करू, पण बहिणींच्या आड कोण आले तर यात आमचा नाद करायचा नाही. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री




