इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न रखडला इंदापूर – दिल्लीला खासदार सुप्रिया सुळे यांना संसद गाजवण्यासाठी, मोठ्या मताधिक्याने इंदापूर तालुक्यातील जनतेने पाठवल्याबद्दल, मी सुप्रिया सुळे यांची वहिनी म्हणून तालुक्याची आभारी आहे. जसे लोकसभेला काम केले तसेच मतदारांनी त्यापेक्षाही अधिक मेहनत घेऊन कार्यक्षम नेतृत्व असलेले हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी काम करावे, असे आवाहन शरयू फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले. इंदापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ शरयू फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शर्मिला पवार यांनी गुरुवारी (दि. 14) इंदापूर तालुक्यातील निंबोडी, काझड, बोरी, लाकडी, हिंगणेवाडी, सपकळवाडी, तावशी या गावांचा गावभेट दौरा करत जाहीर सभा घेतल्या. यावेळी शर्मिला पवार बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अंकिता पाटील ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) तालुका अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, सागर मिसाळ, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सपकळ, ऋतुराज निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शर्मिला पवार म्हणाल्या, आम्ही सामाजिक कामात लोकांच्या सोबती होतो. आगामी काळात राजकारणात देखील जनतेची सेवा करू, जो आयुष्याचा विचार करतो तो माणसं जोडतो. हे काम शरयू फाउंडेशनने प्रामाणिकपणे केले आहे. इंदापूर तालुक्यातील काही गावे पाणीदार करण्याची भूमिका शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून केले आहे. महागाई वाढली आहे, शेतीमालाला भाव नाही. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. दूध उत्पादक शेतकर्यांच्या दुधाला भाव नाही, उलट दोन रुपयाने दुधाचा दर कमी झाला. या सर्व गोष्टींवर मार्ग काढण्यासाठी आपल्या विचारांचा आमदार इंदापूर तालुक्याला हवा आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न इंदापूर तालुक्यात अत्यंत गंभीर आहे. खडकवासला कॅनॉलचे पाणी शेतीपर्यंत कोणाचेही पोहोचत नाही. बावीस गावात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जात नाही. तर उजनी बॅकवॉटर परिसरात पाणी असून देखील नियोजन नसल्यामुळे, शेतकरी अडचणीत सापडला आहे. दहा वर्षे जिल्हा नियोजन मंडळाचे आपले लोकप्रतिनिधी सदस्य आहेत; मात्र शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही. -अंकिता पाटील ठाकरे, माजी जि. प. सदस्य