Shashi Tharoor : “राहुल गांधींचा पक्षातच पाठिंबा घटतोय”; शशी थरुर यांच्या वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल
काँग्रेसकडून राहुल गांधी यांना देशाचे भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले जात असताना, भाजपने यावरून जोरदार निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi | Shashi Tharoor – काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा स्वतःच्याच पक्षात आणि मित्रपक्षांमध्ये पाठिंबा कमी होत चालला असल्याचा दावा भाजपने शनिवारी केला आहे. काँग्रेस खासदार डॉ. शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्याचा दाखला देत भाजपने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहझाद पूनावाला यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पंतप्रधान मोदींनी भारतीय खलाशांच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे देशाची भूमिका मांडली, त्याचे शशी थरुर यांनी कौतुक केले आहे. थरुर यांचे हे वक्तव्य राहुल गांधी यांच्या भूमिकेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
पूनावाला उपरोधाने म्हणाले, कालच राहुल गांधी यांचा वाढदिवस होता, पण त्यांना कोणतीही चांगली भेट मिळाली नाही. उलट डॉ. शशी थरुर यांनी खलाशांच्या मुद्द्यावर राहुल गांधींच्या भूमिकेच्या उलट वक्तव्य केले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर भारताची बाजू अत्यंत प्रभावीपणे आणि ठामपणे मांडली, असे थरुर यांनी म्हटले आहे.
एवढेच नाही तर थरुर यांनी पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचे, वक्तृत्वाचे आणि कार्यशैलीचे तोंडभरून कौतुक केले आहे. मोदींनी भारतीयांच्या जीवनावर एक वेगळी छाप सोडली आहे, असेही थरुर यांनी मान्य केले आहे, असा दावा पूनावाला यांनी केला.
काँग्रेसकडून राहुल गांधी यांना देशाचे भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केले जात असताना, भाजपने यावरून जोरदार निशाणा साधला आहे. एकीकडे काँग्रेस राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील असा दावा करते, पण त्यांच्याच खासदारांचा यावर विश्वास दिसत नाही. ९९ निवडणुका हरल्यानंतर राहुल गांधींनी लोकमान्यता गमावली आहे.
रामचंद्र गुहा असोत की शशी थरुर, जे कधी काळी त्यांच्या जवळचे मानले जायचे, त्यांचाच पाठिंबा आता राहिलेला नाही. अगदी डावे पक्ष किंवा द्रमुकसारखे मित्रपक्षही त्यांचे नेतृत्व स्वीकारायला तयार नाहीत. राहुल गांधी हे आता फक्त रील नेते उरले आहेत, रिअल नेते (वास्तविक नेते) नाहीत अशी बोचरी टीका शेहझाद पूनावाला यांनी केली.






