केळघर – पुनवडी, ता. जावळी येथील करोनाबधितांच्या संख्येत काल (दि. 16) रात्री 16 ने वाढ झाली असून तेथील बधितांचा एकूण आकडा 91 वर गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या गावाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शुक्रवारी भेट देऊन गावातील सर्वांच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्याची सूचना आरोग्य विभागाला दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड उपस्थित होते.
सातपुते यांनी गावाची पाहणी केली व आरोग्य विभागास सूचना दिल्या. डॉ. आठल्ये यांनीही आरोग्य विभागाला सूचना दिल्या. दरम्यान, पुनवडीतील 82 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले आहेत. आजअखेर 379 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. जावळी तालुक्यात आतापर्यंत एकूण 249 करोनाबाधित सापडले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
112 रुग्ण करोनामुक्त झाले असून 126 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुनवडीतील सरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती सपोनि राठोड यांनी दिली.