‘सुनीता विलियम्स’ यांची अंतराळातून सुटका? उद्या झेपावणार स्पेसएक्सचं यान, आतापर्यंत काय-काय घडलं अन् संपूर्ण मोहीम कशी असणार…

Sunita Williams – आठ महिन्यांहून अधिक काळ अंतराळ स्थानकात असलेल्या भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर ‘सुनीता विल्यम्स’ लवकरच पृथ्वीवर परत येणार आहेत. सुनीता विल्यम्स गेल्या 8 महिन्यांपासून अवकाशात अडकल्या आहेत. आता दिनांक 16 ते 19 मार्चदरम्यान त्या पृथ्वीवर येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बुच विल्मोर यांनी सीएनएनला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या पुनरागमनाबद्दल माहिती दिली आहे. बुच विल्मोर देखील सुनीतासोबत या मोहिमेवर गेले आहेत.
कसं असेल त्यांचं बचावकार्य?
12 मार्चला ‘ड्रॅगन’ स्पेसक्राफ्टद्वारे स्पेस एक्सचा ‘क्रू 10’ म्हणजे अंतराळवीरांचं दहावं पथक स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावेल. नासाच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून हा लाँच होईल. गुरुवारी 13 मार्चला हे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉक होईल (हे यान अंतराळाला जोडले जाईल) यानंतर हे यान अंतराळ स्थानकापासून विलग होईल आणि 16 ते 19 मार्चदरम्यान क्रू 9 मिशनच्या अंतराळवीरांसोबतच बोईंगच्या मोहीमेच्या अडकलेल्या दोन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येईल.
या पथकात NASAच्या अॅन मॅकक्लेन (कमांडर) आणि निकोल एयर्स (पायलट) यांच्यासह JAXA (जपान अंतराळ संशोधन संस्था) चे टाकुया ओनिशी आणि Roscosmos (रशियन अंतराळ संस्था) चे किरील पेस्कोव यांचा समावेश आहे. ड्रॅगन स्पेसक्राफ्ट याचा वापर अंतराळ स्थानकातून अंतराळवीरांची ने-आण करण्यासाठी केला होतो. ‘इलॉन मस्क’ यांच्या खासगी अंतराळ कंपनीत याची निर्मिती केली गेली आहे.
सुनीता विल्यम्स यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
दि. 5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी बॅरी बुच विल्मोर हे दोघे अंतराळवीर बोईंग स्टारलायनरच्या चाचणीच्या मोहिमेसाठी अंतराळात गेले. त्यांनी जुलैमध्ये स्पेस स्टेशनवर पोहोचल्यानंतर, एक पत्रकार परिषदेत लोकांना ते आपल्या कामात व्यस्त आहेत, दुरुस्ती आणि संशोधनात मदत करत आहेत असा विश्वास व्यक्त केला होता. तेव्हा त्यांचा 13 जून 2024 रोजी परतण्याचा निर्णय झाला होता. पण दुर्दैवाने हे दोघे अंतराळ स्थानकात अडकले.
सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच जूनमध्ये अंतराळ स्थानकावर पोहोचले. तथापि, डॉकिंग करण्यापूर्वी फ्लाइटला हेलियम गळती आणि थ्रस्टर निकामी झाले. नासाच्या वैज्ञानिकांनी यानातील बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अखेर दोन्ही अंतराळवीरांना न घेताच यान पृथ्वीवर परतले आणि त्यांचे परतीचे सर्व रस्ते बंद झाले. आणि त्यांचा आठ दिवसांचा मुक्काम तब्बल आठ महिन्यांवर गेला.
चेहरा आणि शरीरयष्टी पाहून चिंता वाढली :
गेल्या अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांचे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या फोटोंवरून, त्यांचा चेहरा आणि शरीरयष्टी पाहून वजन कमी झाल्याचे दिसून आले. अत्यंत कमी गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत जगणे जिकिरीचे असते. यावेळी अन्न-पाणी याची देखील उणीव भासू लागते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो.
पृथ्वीवर आल्यानंतर ‘या’ अडचणींना सामोरे जावे लागणार?
– चालणे कठीण होऊ शकते : अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या कमतरतेमुळे, शरीराचे स्नायू कमकुवत होतात. तिथे शरीराला कोणतेही काम करण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाहीत कारण सर्व काही हवेत तरंगते. पण आपण पृथ्वीवर परत येताच, शरीराला गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घ्यावे लागते. यामुळेच अंतराळवीरांना सुरुवातीचे काही दिवस चालणे आणि संतुलन राखणे कठीण होते.
– हाडांवर परिणाम : अंतराळात राहिल्याने दरमहा हाडांची घनता सुमारे 1% कमी होते. विशेषतः पाय, पाठ आणि मानेची हाडे जास्त प्रभावित होतात. यामुळे, सुनीता परतल्यानंतर शारीरिक हालचालींमध्ये अडचण येऊ शकते.
– डोळ्यांवर परिणाम : अवकाशात शून्य गुरुत्वाकर्षणामुळे, शरीरातील द्रव डोक्याकडे सरकतात, ज्यामुळे डोळ्यांमागील नसांवर दबाव येतो. यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो आणि त्यांना चष्मा घालण्याची आवश्यकता असू शकते.
– रोगप्रतिकारक शक्ती : अंतराळात उच्च-स्तरीय किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्याने अंतराळवीरांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे त्यांना संसर्ग आणि इतर आजारांचा धोका वाढू शकतो. याशिवाय, दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने डीएनएमध्ये बदल, हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
भारताशी नातं काय?
सुनीता विल्यम्स ह्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी ओहायो राज्यातील ‘युक्लिड’ येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव हे ‘सुनीता लिन पांड्या विलियम्स’ असे आहे. त्या मूळच्या भारतीय वंशाच्या असून त्यांचे वडील हे दीपक पंड्या हे एक भारतीय आहेत आणि त्यांच्या आई ह्या बॉनी पंड्या स्लोवेनियन वंशाची आहेत.
सुनीता ह्यांचे बालपण आपल्या दोन लाडक्या भावंडांसोबत गेले. त्यांचे शालेय शिक्षण मासाच्युसेट्स राज्यातील नीडहॅम हायस्कूलमध्ये पूर्ण केले आहे. हायस्कूलनंतर, त्यांनी युनायटेड स्टेट्स नेव्हल अकॅडमीत प्रवेश घेतला, जेथे त्यांनी 1987 साली भौतिकशास्त्रात बॅचलर ऑफ सायन्स पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली.
नासा मधील निवड ते पहिली अंतरिक्ष यात्रा :
सुनीता विल्यम्स यांची नासा मध्ये जून 1998 मध्ये निवड झाली होती. त्यांनी नासा मध्ये अंतरिक्षवीर म्हणून प्रशिक्षण घेतले आणि त्यांची पहिली अंतरिक्ष यात्रा हि 9 डिसेंबर 2006 रोजी सुरू झाली. त्यांनी STS-116 शटल मिशनमध्ये सहभाग घेतला आणि अंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचली. यावेळी त्या तब्बल 195 दिवस अंतराळात होत्या.
‘या’ पुरस्काराने झाले सन्मानित:
सुनीता विल्यम्स या अनेक पुरस्काराने सन्मानित झाल्या असून, त्यांचे कार्य देखील खूप मोठे आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार (2008), नासा अंतराळ उड्डाण पदक (2007, 2012), नासा असाधारण सेवा पदक (2002), नासा असाधारण नेतृत्व पदक (2013), हार्वर्ड कनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अॅल्युम्नाय अचिव्हमेंट अवॉर्ड (2008), स्टीव्हनस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मेडल (2011), इंडियन अॅमेरिकन अवॉर्ड (2007) असे पुरस्कार मिळाले आहेत.
भाविषयातील नियोजन :
पृथ्वीवर परतल्यानंतर सुनिता विल्यम्स भविष्यात NASA चे प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेतील, ज्यात नवीन अंतराळ स्थानकांचे बांधकाम, विविध प्रकारचे प्रयोग आणि त्यांच्यातील संशोधनांचा समावेश आहे. या सोबत विविध प्रकारचे अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी राहण्याची योजना करीत आहेत.
कारण त्यांचा अनुभवाचा उपयोग करून भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षक म्हणून काम करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सखोल माहिती मुळे तिच्या अनुभवांव्दारे समाजात अंतराळ विज्ञानाबद्द्लची माहिती सांगू शकते. किंवा आपल्या कुटुंबासोबत राहतील.
सुनीता विल्यम्स यांची प्रेमकथा :
सुनीता विल्यम्स आणि मायकेल जे. विल्यम्सची प्रेमकथा रोमांचक आणि प्रेरणादायी आहे. दोघांची भेट 1987 मध्ये नौदल अकादमीमध्ये झाली आणि लवकरच मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. मायकेल जे. विल्यम्स हे एक फेडरल मार्शल आहेत, ज्यांना अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेचे रक्षण करणे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
सुनीता हिंदू श्रद्धांचे पालन करते आणि तिने भगवद्गीता आणि ओम चिन्ह अवकाशात नेले. त्यांना अद्याप मुले नाहीत, परंतु त्यांनी 2012 मध्ये अहमदाबादमधून एक मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पाळीव प्राण्यांवर विशेष प्रेम आहे आणि त्यांचा गोर्बी नावाचा एक कुत्रा होता, जो नॅशनल जिओग्राफिक शोमध्ये दिसला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत अंतराळवीरांना संदेश पाठवला की, “आम्हाला तुमच्यावर प्रेम आहे आणि आम्ही तुम्हाला परत आणण्यास तयार आहोत.” त्यांच्या परत येण्यास आणखी विलंब होणार नाही, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली.
ट्रम्प यांनी या विलंबासाठी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाला जबाबदार धरले. ते म्हणाले, “तुम्हाला तिथे इतके दिवस राहायला नको होते. आपल्या इतिहासातील सर्वात अक्षम अध्यक्षाने (बायडेन) हे होऊ दिले, पण आता हे होणार नाही.”
याशिवाय, ट्रम्प म्हणाले की त्यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना या मोहिमेसाठी आठवड्यापूर्वी परवानगी दिली होती. मस्क यांनी या विलंबासाठी बायडेन प्रशासनालाही जबाबदार धरले, जे अंतराळवीर बुच विल्मोर यांनी योग्य असल्याचे सांगितले. असं देखील ते यावेळी म्हणाले.





