सुनिता विल्यम्स यांची मोहीम फत्ते, पण कल्पना चावला यांच्याबाबत 22 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Kalpana Chawla | अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे पृथ्वीवर पुन्हा एकदा आगमन झाले आहे. बुधवार, १९ मार्च रोजी पहाटे ३:३० वाजता सुनीता त्यांचे साथीदार बुच विल्मोरसह, स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरल्या. त्यांच्या परत येण्याने जगभरात आनंदाचे वातावरण आहे.
एक व्यावसायिक प्रयोग म्हणून 8 दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला गेलेले अंतराळवीर गेलेल्या यानात तांत्रिक अडचण आल्याने ९ महिन्यांपासून त्या अंतराळातच अडकले होते. या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या यशस्वी कामागिरीनंतर सर्वत्र आनंद साजरा केला जात असतानाच दुसरीकडे एक जुनी वेदना देखील उभी राहिली आहे. कल्पना चावला यांची 22 वर्षांपूर्वी झालेली दुर्घटना आज भारतीयांच्या मनावर कोरलेली दु:खद जखम पुन्हा त्या घटनेची आठवण करून देत होती.
पृथ्वीवर प्रवेश करतानाचा आव्हानात्मक टप्पा कल्पना चावलाच्या कॅप्सुलला पेलवला नव्हता. यात त्यांचा मृत्यू झाला होता. 1 फेब्रुवारी 2003 रोजी, भारतीय कन्या कल्पना चावला अंतराळातून परतत होती. त्यावेळी कल्पना यांचे कोलंबिया स्पेस शटल अपघातात निधन झाले होते. त्या दिवशी संपूर्ण भारतातून दु:ख व्यक्त करण्यात आले. आता सुनीता यांच्या परत येण्याने पुन्हा एकदा त्या अपूर्ण आशेची आठवण करून देते.
कल्पना चावला अंतराळात पाऊल ठेवणारी पहिली भारतीय वंशाची महिला होती. कल्पना चावला यांनी 19 नोव्हेंबर 1997 रोजी पहिल्यांदा अंतराळात झेपावले. पहिल्या अंतराळ प्रवासात त्या 372 तास अंतराळात राहिल्या. त्यानंतर 16 जानेवारी 2003 रोजी त्यांना दुसऱ्यांदा अंतराळात जाण्याची संधी मिळाली.
कल्पना चावला यांच्याबाबत नेमकं काय घडलं होतं?
नासाच्या मते, कल्पना चावला दुसऱ्या अंतराळ मोहिमेवर STS-107 वर गेल्या होत्या. 16 दिवस अंतराळात घालवल्यानंतर कोलंबिया अंतराळयान पृथ्वीवर परतत होते. पण लँडिंगच्या फक्त 16 मिनिटे आधी, डाव्या पंखात बिघाड झाल्यामुळे अंतराळयानाचा अपघात झाला. कल्पना चावला यांचे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात पोहोचताच हवेच्या जोरदार घर्षणाच्या उष्णतेमुळे मोठा स्फोट झाला आणि टेक्सास आणि लुईझियानावर आकाशात विखुरलेल्या कोलंबियाने कल्पनासह सात अंतराळवीरांना आपले प्राण गमवावे लागले.
एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी
कल्पना चावला यांचा जन्म 1 जुलै 1962 रोजी हरियाणातील कर्नाल येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कर्नाल येथे झाले. त्यानंतर पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केले. अमेरिकेतून एरोस्पेस इंजिनीअरिंगची पदवी घेऊन कल्पना 1982 मध्ये अमेरिकेला गेल्या. त्यांनी 1984 मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. 1986 मध्ये त्यांनी त्याच विषयावर दुसरी पदव्युत्तर पदवी आणि नंतर पीएचडी केली. कल्पना चावला यांनी 1983 मध्ये व्यवसायाने फ्लाइंग इन्स्ट्रक्टर असलेल्या फ्रान्सच्या जॉन पियरेशी लग्न केले.
…अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
सुनिता विल्यम्स येत असलेली कॅप्सुल पृथ्वीच्या बाह्या वातावरणावर धडकली, घर्षणामुळे ही कॅप्सुल एवढी तापली की क्षणात तापमान १९०० डिग्रीवर गेले आणि सात मिनिटांसाठी नासाचा कॅप्सुलशी संपर्क तुटला. पहाटेची ३.२० ची वेळ होती. ३.१३ ला संपर्क तुटला, यान कुठे आहे ते कळत नव्हते. नासाचे शास्त्रज्ञ सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. ३.२० ला पुन्हा संपर्क झाला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हे सात मिनिट म्हणजे ब्लॅक आऊट समजले जाते. ते खूप निर्णायक असतात. पृथ्वीच्या आवरणात प्रवेश करताना बाहेरील ऑब्जेक्टला खूप संघर्ष करावा लागतो. यावेळी तापमान वाढल्याने क्रॅश होण्याची शक्यता जास्त असते. अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना त्याचा वेग हा अंदाजे २८००० किमी प्रति तास एवढा प्रचंड असतो. कॅप्सूल एवढ्या वेगाने खाली येते तेव्हा त्याचे घर्षण होते व तापमान वाढते. तसेच अनियंत्रितही होते. या काळात कंट्रोल रुमसोबत संपर्कही तुटतो. हा आघात सहन केला तरच ते यान सुखरूप खाली उतरते.
हेही वाचा :
येमेनमध्ये अमेरिकेचे हवाई हल्ले ; हुथींच्या शस्त्रास्त्र गोदामांसह क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त





