गोविंदा-सुनीताच्या घटस्फोटाच्या अफवांना सुनीताने दिला पूर्णविराम

मुंबई – बॉलिवूडचा नंबर 1 हिरो गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहूजा यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना अस्वस्थ केले होते. गोविंदाच्या वकिलाने यापूर्वी सांगितले होते की, दोघांमधील सर्व काही आता ठीक आहे, तरीही या जोडप्याकडून कोणतेही अधिकृत निवेदन समोर आले नव्हते. अखेर सुनीता यांनी यावर मौन सोडले आणि लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात, हे आपल्याला माहीत असल्याचे सांगितले.
नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनीताने गोविंदा आणि तिच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले. या काळात तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागल्याचे तिने उघड केले. लोक त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलत असल्याचे सांगताना सुनीता म्हणाल्या, “मला वाटतं, लोक म्हणजे कुत्री आहेत, भुंकतच राहणार.”
चाहत्यांना सुनीताचा संदेश
सुनीताने लोकांना घटस्फोटाच्या अफवांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. गोविंदाच्या चाहत्यांना उद्देशून ती म्हणाली, “जोपर्यंत तुम्ही गोविंदा किंवा माझ्या तोंडून हे ऐकत नाही, तोपर्यंत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका.”
सुनीताने दाखल केली होती घटस्फोटाची अर्ज –
जेव्हा गोविंदा आणि सुनीताच्या घटस्फोटाची अफवा पसरली होती, तेव्हा गोविंदाच्या वकिलाने सांगितले होते की, सुनीताने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण आता दोघांमधील सर्व काही ठीक झाले आहे. वकिलाने म्हटले होते, “ते नवीन वर्षात नेपालला गेले होते आणि पशुपतीनाथ मंदिरात एकत्र पूजा केली. आता त्यांच्यात सर्व काही व्यवस्थित आहे. जोडप्यांमध्ये अशा गोष्टी घडतात, पण ते मजबुतीने पुढे जात आहेत आणि नेहमीच एकत्र राहतील.”
अफवा कशी पसरली? –
हिंदी वाहिनीशी बोलताना सुनीताने गोविंदाच्या कुटुंबापासून वेगळे राहण्याचा संकेत दिला होता. ती म्हणाली होती, “आम्ही वेगळे राहतो. आमच्याकडे दोन घरे आहेत. फ्लॅटमध्ये माझे मंदिर आणि माझी मुलं आहेत. आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, तर तो बंगल्यात राहतो. तो मिटिंग्जनंतर उशिरा येतो.” मात्र, नंतर माध्यमांशी बोलताना सुनीताने स्पष्ट केले की, लोकांना भेटण्यासाठी आणि कामासाठी ते दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहतात. सुनीताच्या या खुलाशाने चाहत्यांना दिलासा मिळाला असून, हे जोडपे एकत्र असल्याचे तिने ठामपणे सांगितले आहे.


