कुरूळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता बागडे यांची बिनविरोध निवड

चिंबळी: खेड तालुक्यातील कुरूळी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुनिता उमेश बागडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत अधिकारी कविता कोतवाल यांनी ही माहिती दिली.
कुरूळी ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांना कामाची संधी मिळावी, या उद्देशाने उपसरपंच तेजश्री जैद यांनी स्वखुशीने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता बधाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सुनिता उमेश बागडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याचे सरपंच अनिता बधाले यांनी जाहीर केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शरद मुऱ्हे, नितीन कड, गुलाब कांबळे, दीपक मुऱ्हे, रमेश पवार, वैशाली मुऱ्हे, कविता गायकवाड, शोभा गायकवाड, तेजश्री जैद, माधुरी माळशिकर, प्रतिभा कांबळे, शिवगंगा सोनवणे आणि सुनिता बागडे उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच सुनिता बागडे यांचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यानिमित्ताने गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी आणि संगीत वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला उत्साहपूर्ण वातावरण प्राप्त झाले. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे, माजी सरपंच तेजस्वी बागडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गुलाब सोनवणे, एम. के. सोनवणे, माजी उपसरपंच बाळासाहेब बागडे, काळूराम कड, मल्हारी बागडे, बाबासाहेब सोनवणे, माजी चेअरमन रामनाथ सोनवणे, सागर मुऱ्हे, अर्जुन बागडे, सागर बागडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी सुनिता बागडे यांना शुभेच्छा दिल्या.





