पुणे | वडगावशेरीतून लढण्यावर सुनील टिंगरे ठाम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी फायनल असल्यामुळे निवडणूक लढविणार असल्याचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे पत्रकारांशी बोलताना नमूद केले आहे.
महायुतीत वडगावशेरी मतदारसंघावर भाजपनेही दावा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाकडून ३८ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली.
मात्र, यात वडगावशेरी मतदारसंघाच्या उमेदवारीचा कोणताही उल्लेख नव्हता. त्यामुळे उमेदवारीबाबत संभ्रम वाढलेला आहे. याबाबत पत्रकारांनी सुनील टिंगरे यांना काही प्रश्न विचारले. त्यावर टिंगरे यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
विद्यमान आमदार असल्याने उमेदवारी आपल्याच मिळणार आहे. त्याबाबत अजित पवारांवर पूर्ण विश्वास आहे. पक्षाने एबी फॉर्म दिलेला आहे. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्नच येत नाही. मैत्रीपूर्ण लढत करायची असल्यास ती अनेक मतदारसंघांत करावी लागेल.
त्यामुळे तसे काहीही होणार नाही, असे सुनील टिंगरे यांनी सांगितले.
शरद पवारांची सहानुभूती घेऊन जर कोण लढत असेल, तर ते कधीच यशस्वी होणार नाहीत. शरद पवार आमच्यासाठी आदरणीयच आहेत. ते माझे कान पकडू शकतात. त्यांना टीका करण्याचाही अधिकार आहे.
माझ्या तीन पिढ्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेले आहे, असे टिंगरे यांनी सांगितले. निवडणुकीत पुढे कोणता पक्ष, चिन्ह, व्यक्ती आहे, हे पाहण्याऐवजी विकासावर निवडणूक लढविणार आहे.
राजकारण करून कोणी कितीही आरोप करून चुकीचे काही मांडले, तरी त्याचा फरक पडणार नाही. मी जितका निधी आणला, तेवढा यापूर्वीच्या कोणत्याच आमदारांनी आणलेला नाही. त्यामुळे जनता खूप हुशार असून, ती विकासालाच मत देईल, अशा विश्वासही टिंगरे यांनी व्यक्त केला.





