Sunil Shelke: १७ कुटुंबांना मिळकत पत्रिकांचे वाटप; आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते पीआर कार्डचे वितरण
Sunil Shelke: मिळकत पत्रिका मिळाल्याने अनेक वर्षांपासून मालकी हक्काच्या नोंदीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला

तळेगाव दाभाडे – कैकाडी समाजातील १७ कुटुंबांच्या घरांची नगर परिषद मालमत्ता म्हणून झालेली नोंद हटवून संबंधित कुटुंबांच्या नावाने स्वतंत्र नगर भूमापन क्रमांक देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच धारणाधिकार अ देण्यात आला. त्यानंतर संबंधित कुटुंबांच्या नावाच्या मिळकत पत्रिकांचे (पीआर कार्ड) वाटप आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
तळेगाव दाभाडे येथील शनिवार पेठ गावठाणातील सर्व्हे क्रमांक २८८ पैकी जागेवर कैकाडी समाजातील संबंधित कुटुंबांची घरे अनेक दशकांपासून आहेत. सुमारे ७० ते ८० वर्षांपूर्वी झालेल्या नोंद प्रक्रियेत या घरांच्या मालकीची नोंद नगर परिषदेची मालमत्ता म्हणून झाली होती. संबंधित कुटुंबांकडून नियमित घरपट्टी भरली जात असतानाही त्यांच्या नावाने स्वतंत्र मालकी हक्काची नोंद झालेली नव्हती.
त्या काळात या परिसराचा सिटी सर्व्हे झालेला नसल्याने हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. आता या प्रक्रियेमुळे १७ कुटुंबांना त्यांच्या घरांच्या मालकीबाबत अधिकृत दस्तऐवज प्राप्त झाला आहे. मिळकत पत्रिका मिळाल्याने अनेक वर्षांपासून मालकी हक्काच्या नोंदीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना दिलासा मिळाला.
कैकाडी समाजातील कुटुंबांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी महसूल विभागाकडे पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. पीआर कार्ड वाटपप्रसंगी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्यासह कैकाडी समाजातील नागरिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Moshi hospital : मोशी रुग्णालय इमारतीचे ६५ टक्के काम पूर्ण; आरसीसी बांधकाम ९० टक्के झाल्याचा दावा





