Moshi hospital : मोशी रुग्णालय इमारतीचे ६५ टक्के काम पूर्ण; आरसीसी बांधकाम ९० टक्के झाल्याचा दावा
Moshi hospital : मार्च २०२७ पर्यंत काम करण्याचे आव्हान

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे ७०० बेडचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची नऊ मजली पर्यावरणपूरक इमारत बांधण्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या इमारतीचे आरसीसी बांधकाम ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. तर, इमारत बांधण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असून मार्च २०२७ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासन व ठेकेदारापुढे आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मौजे मोशी येथील गट क्र. ६४६ मधील गायरान जागेवर अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. तब्बल १५ एकर भूखंडावर हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. मोशी आणि परिसरातील दहा किमी अंतराच्या परिघातील नागरिकांना माफक दरात वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात. या उद्देशाने हे रूग्णालय बांधण्यात येत आहे. या इमारतीचे प्रत्यक्ष काम मार्च २०२४ ला सुरू झाले असून कामाची मुदत तीन वर्षे आहे.
एकूण बांधकाम क्षेत्रफळ ५७ हजार ४५० चौरस मीटर इतके आहे. ही इमारत पार्किंगसह तळघर आणि ८ मजले अशा प्रकारे बांधण्यात येत आहे. रुग्णालय इमारतीचे भौतिकदृष्ट्या ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, आरसीसीचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच बांधकाम व प्लास्टरचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. विविध मजल्यांवर फरशी बसविणे, विद्युत केबल्स टाक़णे, अग्निशमन व वातानुकल यंत्रणेसाठी नलिका टाकणे व सलग्न इतर कामे प्रगतीपथावर आहेत. रुग्णालयाच्या परिसरातील जागा विकसित करण्याचे कामही सुरू आहे.
आजअखेर इमारतीसाठी १७० कोटींचा खर्च
मोशी रुग्णालय इमारत उभारणीसाठी मूळ निविदा रक्कम ३४० कोटी ६७ लाख रुपयांची काढण्यात आली होती. तर, स्वीकृत निविदेनुसार एकूण ३५६ कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च या इमारतीसाठी होणार आहे. आर्थिक प्रगती ४६ टक्के असून आतापर्यंत सुमारे १७० कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे. हे काम मे. वॅसकॉन इंजिनियर्स प्रा. लि., पुणे या कंत्राटदारामार्फत केले जात आहे.
‘प्रकल्प सल्लागार व कंत्राटदार यांच्याकडून वेळोवेळी कामाचा आढावा घेतला जात आहे. सद्यस्थिती आरसीसी बांधकाम ९० टक्के झाले असून प्रकल्पाचे सर्वसाधारण प्रगती ६५ टक्के आहे. मुदतीत काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न आहे.’ – विजय भोजने, कार्यकारी, अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
Raviraj Sable : रविराज साबळे निवडणुकीच्या मैदानात; पदवीधर मतदारसंघातून अपक्ष लढणार





