Sunetra Pawar post : अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची घोषणा पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केली. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी त्याचे पती आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. बोलताना त्यांचा हुंदका दाटून आला होता. वरळी येथील डोम सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानुसार त्या पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या असून, पक्षाची सर्व सूत्रे अधिकृतरित्या त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भगिनी-बंधू आणि जनतेचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनतेला महत्वाचा शब्द दिला आहे. सुनेत्रा पवारांची एक्सवरील पोस्ट आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रीय अधिवेशन २०२६’ यशस्वीरीत्या पार पडले. या अधिवेशनात मला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सर्वानुमते सोपवून सर्वांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल मी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भगिनी-बंधू आणि जनतेची मनःपूर्वक आभारी आहे. हा क्षण माझ्यासाठी केवळ सन्मानाचा नाही, तर मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. लाखो कार्यकर्त्यांच्या आशा-अपेक्षा, पक्षाची विचारधारा आणि जनतेच्या सेवेसाठीची बांधिलकी अधिक बळकट करण्याचा मी निर्धार व्यक्त करते. पूर्ण निष्ठा, समर्पण आणि प्रामाणिकपणे पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी अहोरात्र कार्य करेन, असा शब्द देते. आपल्या सर्वांचे लाडके नेते, आदरणीय दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही मनाला अस्वस्थ करते. महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्यांसाठी त्यांनी आयुष्यभर झटत काम केले. त्यांची अनेक स्वप्ने अपूर्ण राहिली असली, तरी ती स्वप्ने आपण सर्वांच्या सामूहिक शक्तीने नक्की पूर्ण करू, हा माझा दृढ विश्वास आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रीय अधिवेशन २०२६’ यशस्वीरीत्या पार पडले. या अधिवेशनात मला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सर्वानुमते सोपवून सर्वांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल मी पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते भगिनी-बंधू आणि… pic.twitter.com/HbbJosXvxb — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 26, 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून तो विचारांचा, संघर्षाचा आणि जनतेशी नाळ जोडलेल्या परिवाराचा प्रवास आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा आपला संकल्प आहे. ग्रामीण भागासोबत शहरी भागातही पक्ष अधिक सक्षम करणे, तरुणांना संधी देणे, महिलांचे सक्षमीकरण, तसेच कृषी, सहकार, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवे पर्व सुरू करणे, ही आपली सामूहिक दिशा असेल. शेतकरी हा आपल्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यावर आपण भर देऊ. कार्यकर्त्यांमधील उत्साहाला योग्य दिशा देत, पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणे हे आपले ध्येय असेल. दादांनी जसा पक्ष जपला, तसाच जपण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. तुमची मुलगी, बहीण आणि सहकारी म्हणून सदैव तुमच्यासोबत उभी राहीन, याची मी खात्री देते. एकजुटीने, धैर्याने आणि निष्ठेने आपण सर्वजण मिळून प्रगत, समावेशक आणि सक्षम महाराष्ट्र घडवूया. पुनःश्च आभार! असे पोस्टमध्ये सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. हेही वाचा : Epstein Files: हिलरी क्लिंटन यांचे आरोपांवर स्पष्टीकरण ,वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सीईओंचांही राजीनामा; दोघांचा एप्सटिन फाईल्सशी नेमका काय संबंध ?