Sunetra Pawar: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे काम जलदगतीने सुरू करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना
Sunetra Pawar: श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे प्रशासनाला निर्देश.

Sunetra Pawar – श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करून प्रलंबित विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित विभागाला स्मारकाचे काम जलदगतीने सुरू करण्याबाबत सूचना दिल्या.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे समाधी स्थळ म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे राज्यस्तरीय स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. या स्मारकाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जपण्यासोबत पर्यटनाला चालना देण्याचा उद्देश आहे. स्मारकाच्या आराखड्यानुसार भीमा नदीवर सुमारे १८ मीटर रुंदीचा व २३० मीटर लांबीचा व्ह्यूईंग गॅलरीसह पूल उभारण्यात येणार आहे.
या गॅलरीमधून परिसराचे दर्शन आणि स्मारक परिसराचा अनुभव घेता येणार असून, तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, संगम घाट, पाथरवट बाजार तसेच दोन्ही स्मृतीस्थळांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यटन आणि स्थानिक रोजगार वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वढू बुद्रुक ग्रामस्थांकडून स्मारक परिसरात ६६ फूट उंचीचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी देखील तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्याकडे केली होती, त्याला सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बोलले जात आहे. स्मारकात प्रवेश केल्यानंतर सुमारे १०० फूट उंच तटबंदीच्या पार्श्वभूमीवर हा पुतळा उभारण्यात यावा, अशी भूमिका शिवले यांनी मांडली आहे.
प्रस्तावित ठिकाणी उभारण्यात येणारा हा पुतळा राज्यातील ऐतिहासिक पर्यटनाचे नवे आकर्षण ठरू शकतो, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांनी स्मारकाचे काम रखडू न देता नियोजित कालावधीत पूर्ण करण्याची मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले.





