Sunetra Pawar: नियमबाह्य कामांना लगाम घालणार? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार महापालिकेत बैठक
गुरुवारी आयुक्तांसह विभागप्रमुखांच्या बैठकीकडे लक्ष

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय कारभार तसेच नियमबाह्य होत असलेल्या निविदांवरून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे आरोप होत असून, काही निर्णय आणि कामकाजाच्या पद्धतीवरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू आहे.
अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गुरुवारी (दि. १९) महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत त्या केवळ विभागनिहाय माहिती घेणार की महापालिकेतील कथित अनियमिततेच्या प्रकरणांवर थेट भूमिका घेत काही महत्त्वपूर्ण निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर आणि उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच महापालिकेत येत आहेत. या बैठकीला आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना प्रलंबित प्रश्न, विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि आर्थिक व्यवहारांची माहिती त्यांच्यासमोर मांडली जाण्याची शक्यता आहे.
तसेच यावेळी शहराचा पाणीपुरवठा, कचरा संकलन व प्रक्रिया, रस्ते व इतर रखडलेले प्रकल्प यासह सर्वच विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या कारभारावर राष्ट्रवादीकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरणार आहेत. नियमबाह्य कामांचे आरोप, मंजुरी प्रक्रियेतील त्रुटी, विकासकामांमधील अनियमितता आणि प्रशासनाच्या निर्णयांबाबत उपमुख्यमंत्री कोणती भूमिका घेतात, याची उत्सुकता आहे.
महापालिका प्रशासनाला पारदर्शक आणि नियमांनुसार कारभार करण्याबाबत त्या काही स्पष्ट सूचना देणार का? वादग्रस्त निर्णयांची चौकशी किंवा संबंधित प्रकरणांचा फेरआढावा घेण्याचे निर्देश देणार का? तसेच शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी काही ठोस निर्णय होणार का? या प्रश्नांची उत्तरे गुरुवारी होणाऱ्या बैठकीत मिळण्याची अपेक्षा आहे. या बैठकीसाठी प्रशासनाने देखील तयारी केली आहे.
Nayanthara: ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराचं आलिशान आयुष्य! १०० कोटींचा बंगला ते स्वतःचं प्रायव्हेट जेट





